रावेर : तालुक्यात निम्म्या पावसाळ्यातही ५० टक्के सरासरी पर्जन्यमान झाले नसताना ३ ते १२ सप्टेंबरदरम्यानच्या अवघ्या १० दिवसांत सरासरी ३१ टक्के झालेल्या पावसामुळे मात्र पूर्वहंगामी कापसाच्या कैऱ्या सडून तर खरिपाच्या कापसाच्या फुलपाती गळून उत्पादनात कमालीची घट येणार आहे. कपाशीच्या पिकावर लाल्या तथा ग्रेब्लॅकमिल्ड्यूसारख्या रोगाची लागण होऊन पूर्णत: पानझड होत असल्याने कापसाच्या हंगामाचा गाशा गुंडाळल्यासारखा आहे किंबहुना, मक्याच्या कणसांमध्येही लष्करी अळीने शिरकाव करीत विळखा घातल्याने मक्याच्या उत्पादनातही कमालीची घट येणार आहे.
विषम वातावरणामुळे केळीलाही फटका
ढगाळ वातावरण, पाऊस तर केव्हा कडक ऊन अशा विषम वातावरणात केळीवर करप्याने आक्रमण केले असून, तालुक्यातील शेतकरी पाऊस नसताना व पाऊस असतानाही तेवढेच हवालदिल झाले आहेत.
पावसाचा प्रदीर्घ काळ पडला खंड
यंदा जून महिन्यापासून ते ऑगस्ट या पावसाळ्याच्या निम्म्यापेक्षा जास्त कालावधीत पावसाने प्रदीर्घ काळ खंड दिल्याने तालुक्यातील सरासरी पर्जन्यमानाने अर्धशतकही गाठले नव्हते. परिणामतः खरिपाच्या हंगामावर ऐन वाढीच्या अवस्थेतच कमालीचा ताण बसल्याने खरिपाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याचे संकेत प्राप्त झाले होते, तर दुसरीकडे मंगरूळ व आभोडा धरण १०० टक्के भरूनही सुकी व भोकर नद्यांचे पात्र कोरडे असल्याची विदारक परिस्थिती होती.
नऊ दिवसांत पावसाची फटकेबाजी
दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या आरंभीच दि. २ सप्टेंबर रोजी झालेल्या दमदार पावसाने तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचे अर्धशतक पार करून ५३ टक्के सरासरी पावसाची आकडेवारी गाठली होती. किंबहुना ३ सप्टेंबरपासून ११ सप्टेंबर पावेतो नऊ दिवसांत उशिराने आलेल्या पावसाने पर्जन्यमानाचे शतक गाठण्यासाठी जणूकाही फटकेबाजी करीत अवघ्या नऊ दिवसांत सरासरी ३१ टक्के पर्जन्यमान गाठल्याने ५७५.७० मिमी अर्थात ८१.६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पावसाळ्यातील चारपैकी तीन महिन्यांत ५० टक्केही नोंद नसलेल्या पावसाने या महिन्यातील केवळ नऊ दिवसांत ३१ टक्के सरासरी हजेरी लावल्याने सरासरी ८१.६६ मिमी पर्जन्यमान झाले. असे असले तरी या उशिराने येणाऱ्या पावसाचा फायदा भूजल पातळी वाढण्यासाठी लाभदायी ठरणार असताना दुसरीकडे मात्र खरिपातील पूर्वहंगामी कापूस, जिरायत कापूस, उडीद, मूग व मका पिकाचे कमालीचे नुकसान झाले आहे, तर जिरायत कापसाच्या फुलपात्यांचा बहर झडून उत्पादनाची अपरिमित हानी होणार असल्याची चिंता भेडसावत आहे.
मका पिकाच्या वाढीवर पावसाच्या महिनाभराचा खंड पडून उत्पादनाची अपरिमित हानी झाली व त्यातच उशिराने आलेल्या पावसाने निसवलेल्या मक्याचे कणसांमध्ये मात्र लष्करी अळीने शिरकाव करीत मक्याचे उत्पादन फस्त केले आहे.
दरम्यान, तब्बल महिनाभराच्या प्रदीर्घ खंडात उन्हाचा वाढलेला तडाखा, तद्नंतर उशिराने आलेल्या पावसाचा तडाखा व अधूनमधून येणारे ढगाळ वातावरण अशा विषम हवामानामुळे करप्यानेही केळीवर विळखा घातला असल्याने केळी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.
रावेर तालुक्यातील कर्जोद शिवारात उशिराने आलेल्या पावसाने लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन पानझड होऊन कापसाच्या कैऱ्या सडून होत असलेले नुकसान दिसत आहे. (छाया : किरण चौधरी)