लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील ॲन्टीजन चाचण्यांचे प्रमाण तिपटीने कमी झाले आहे. ग्रामीण भागात पुरेशी किट नसल्याने तपासण्यांची संख्या कमी झाल्याचे समोर येत आहे. मात्र, किट पुरेसे असून आता आरटीपीसीआर वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून ६५ लाख रुपयांच्या ॲन्टीजन किट खरेदीची प्रक्रियाही लांबत असल्याने किटचा तुटवडा आहे. चाचण्या कमी असल्यानेच रुग्ण संख्या कमी झाल्या आहे. दरम्यान, ग्रामीण भागात आता चाचण्याच होत नसल्याचे जिल्हा परिषदेतही चर्चीले जात आहे. ६५ लाख रुपयातून ॲन्टीजन किट खरेदी केली जाणार होती. मात्र, यात दराबाबत तोडगा न निघाल्याने हा प्रस्ताव रखडला होता. तो अद्याप निकाली निघाला नसून त्यानंतर किट खरेदी होणार आहे. यात साधारण ६८ ते ७० हजार किट उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती आहे.
७० टक्के आरटीपीसीआर हव्या
गेल्या महिन्यात रुग्णसंख्या अधिक असल्याने ॲन्टीजन वाढवून तातडीने निदान केले जात होते. मात्र, आता आरटीपीसीआर या ७० टक्के व ॲन्टीजन चाचण्या या ३० टक्के असाव्यात असे शासनाचे पत्र असल्याने ॲन्टीजनचे प्रमाण कमी केल्याचे व आरटीपीसीआर चाचण्या वाढविणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. ग्रामीण भागात चाचण्या सुरूच आहेत. आपल्याकडे अद्यापही ४० हजार किट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे किटची अडचण नसून शासनाच्या पत्रानुसारच आपण चाचण्या करणार आहोत.
खासगीतही तपासणी
आरटीपीसीआर चाचण्यांसाठी एका खासगी लॅबमध्ये ३०० रुपये प्रति तपासणी नुसार आपल्याला तपासण्या करून मिळणार असल्याने शिवाय डॉ.उल्हास पाटील रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या प्रयोगशाळांमध्ये साडे तीन हजारांपर्यंत तपासण्या होऊ शकतात, त्यामुळे आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या साधारण ७ हजार आणि ॲन्टीजन साधारण ३ हजार असे प्रमाण ठेवणार असल्याचे डॉ.चव्हाण यांनी सांगितले.