शांतीनगरात शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास विशाल ऊर्फ काली दिलीप सूर्यवंशी याने तेजस राजेंद्र सपकाळे यांच्या पोटावर चाकूचे वार केले. यात तेजस गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दत्त मंदिराच्या परिसरात शांतीनगरमध्ये विशाल ऊर्फ काली याची दुचाकी तेजसच्या अंगावर आली असता तेजस व काली याच्यात वाद झाले. यावेळी काली याने त्याच्या जवळील चाकूने वार केले. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी संशयिताचे नाव मिळवित संशयित विशाल ऊर्फ काली सूर्यवंशी याला घरून ताब्यात घेतले. जखमीची प्रकृती बरी नसल्याने त्याने रात्री जबाब दिला नाही. मात्र, रविवारी निरीक्षक प्रताप इंगळे यांनी रविवारी पुन्हा हॉस्पिटलला जात जखमी तेजस याचा जबाब घेऊन रात्री उशिरा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी संशयित सूर्यवंशी याला अटक केली. पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चौधरी पुढील
तपास करीत आहेत.