भुसावळ : तालुक्यातील कंडारी गावातील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येऊन सरपंचपदी विराजमान झालेल्या सुवर्णा नितीन कोळी यांनी ग्रामपंचायत मालमत्ता कराची रक्कम मुदतीत न भरणा केल्यामुळे त्यांना सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. याप्रकरणी दीपक रमेश तायडे यांनी अर्ज केला होता.
यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी कराचा भरणा वेळेवर न करणे, शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करणे, अशा तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात अशा सदस्यांवर काय कारवाई होते, यावर त्या त्या गावांच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.