एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार
जळगाव : जळगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या ललिता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता. यानुसार विद्यमान सभापती नंदलाल पाटील यांनी ठरल्यानुसार आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात ललिता पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंचायत समितीला भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
शासनाच्या विविध विकासाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा, असा सल्ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवनिर्वाचित सभापतींना दिला. निवडणूक पीठासन अधिकारी तथा तहसीलदार नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. ललिता जनार्दन पाटील (कोळी) या ममुराबाद गणातून शिवसेनेतर्फे निवडून आल्या आहेत. निवडीच्यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सहाय्यक गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, विस्तार अधिकारी एन. डी. ढाके, महेश जाधव आदींनी निवडणूक कामकाजास सहकार्य केले. यावेळी उपसभापती संगीता चिंचोरे, पंचायत समिती सदस्य ज्योती महाजन, जागृती चौधरी, विमल बागुल, शीतल पाटील, निर्मलाबाई कोळी, यमुनाताई रोटे, नंदलाल पाटील, हर्षल चौधरी आदी उपस्थित होते.
पक्षीय बलाबल
एकूण सदस्य १०
शिवसेना ८
भाजप २
१० पैकी ८ सदस्य महिला
पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
निवड घोषित झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ललिता पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, जि.प. सदस्य पवन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, महानगर प्रमुख शरद तायडे, तुषार महाजन, भरत बोरसे, रामचंद्र पाटील, जनार्धन पाटील, मच्छींद्र पाटील, दिलीप जगताप आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
कोट
ग्रामीण भागातील जनता कामे घेऊन पंचायत समितीला आल्यानंतर त्यांची कामे खोळंबणार नाही. याची दक्षता घेतली जाईल, अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करू नये, याकडे लक्ष देणार आहे. शिवाय ग्रामीण भागात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर अधिक भर राहणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकास हे आगामी काळात ध्येय राहणार आहे. - ललिता पाटील, नवनियुक्त सभापती, जळगाव, पंचायत समिती