नंदुरबार : शहरातील मोठा मारुती मंदिर आणि संजय टाऊन हॉल चौकात गतिरोधक नसल्याने भरधाव वेगातील वाहनधारकांमुळे अपघात होत आहेत. यासाठी येथे गतिरोधक बसविण्याची आवश्यकता आहे.श्रॉफ हायस्कूलसमोर धुळे रस्त्याकडून, नाट्यमंदिराकडून, सोनी विहीरमार्गे, तसेच शासकीय विश्रामगृहाकडून येणारी वाहने संजय टाऊन हॉलच्या चौकात येतात. मात्र याठिकाणी संजय टाऊन हॉलच्या संरक्षक भिंतीलगत मोठय़ा प्रमाणावर गुलाबी फुलांची झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या वाढलेल्या असून, या फांद्यांमुळे भरधाव वेगात येणारी वाहने एकमेकांना नजरेस पडत नाहीत. तसेच मोठा मारुती मंदिर ते सोनी विहीरदरम्यान गतिरोधक नसल्याने महाविद्यालयीन युवक, शालेय विद्यार्थी सुसाट वाहने चालवितात. तसेच याच ठिकाणी वळणावर तीनचाकी, चारचाकी, वाहनांनादेखील अडचण येत असते.संजय टाऊन हॉल चौकात सध्या चौपाटीप्रमाणे अनेक हातगाड्या लागल्या असून अनेक वाहनधारक रस्त्यावर वाहने थांबवून नाश्त्याचा आस्वाद घेतात. याशिवाय शाळा सुटल्यानंतर याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. पायी चालणार्यांसह सायकल, रिक्षा, दुचाकी, बसेस, ट्रक याच मार्गावरून ये-जा करतात.त्यामुळे संजय टाऊन हॉल आणि मोठा मारुती मंदिराजवळ गतिरोधक बसविण्यात यावे, तसेच रस्ता मोकळा करण्याची मागणी होत आहे. अत्यंत वर्दळीच्या या चौकात शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. अनेक वेळा सकाळी व सायंकाळी, रात्री फिरण्यासाठी जाणार्या नागरिकांना भरधाव वेगातील वाहनधारकांची भीती असते. नंदुरबार येथे मोठा मारुती मंदिरासमोरून जळका बाजाराकडे जाणार्या तीव्र उताराच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहनधारक बेफामपणे वाहने चालवित असल्याचा सर्वसाधारण अनुभव आहे.
गतिरोधकाअभावी अपघाताला निमंत्रण
By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST