जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाला भाडेतत्त्वावर देताना राबविण्यात आलेल्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एनमुक्टो संघटनेच्यावतीने प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ.ई. वायुनंदन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाविद्यालयीन व्यवस्थापनातील वादामुळे एका महाविद्यालयातील प्राध्यापकांची कॅस अंतर्गत पदोन्नती होऊ शकत नाही़ या संदर्भात विद्यापीठाने धोरणात्मक निर्णय घ्यावा. तसेच विधी अधिकारी यांच्या गैरकारभाराबाबत अधिसभेत स्वीकृत झालेल्या स्थगित प्रस्तावाच्या अनुषंगाने चौकशी समिती नेण्यात यावी व तक्रार निवारण समितीचे चेअरमन यांची बेकायदेशीर असलेली नेमणूक रद्द करण्यात यावी व त्यांना पदावरून हटविण्यात यावे आदी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर एनमुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल पाटील व सरचिटणीस डॉ.जितेंद्र तलवारे यांच्या स्वाक्षरी आहेत.