इसवी सन १३७० मध्ये दिल्लीचा सुलतान फिरोज तुघलक याने मालिकराज फारुकी या अरब तरुणाला खान्देशचे सुभे दिले होते. सन १६०० पर्यंत फारुकीची राजवट येथे होती. अकबर बादशहाच्या कारकिर्दीत खान्देश हा मोगलांच्या अधिपत्याखाली आला. सन १६२९-३० मध्ये खान्देश लढाई व दुष्काळ अशा दुहेरी संकटात सापडला.
सुरत येथील ईस्ट इंडिया कंपनीची वखार भरभराटीला आलेली होती. त्यावेळी सुरत हे शहर मोगलांच्या अधिपत्याखाली होते. सन १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर स्वारी केली. यामुळे घाबरून जाऊन इंग्रजांनी ही वखार दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अनेक प्रदेशांची पाहणी केली. या काळात खान्देशात शांतता, सुबत्ता आणि स्थिरता होती. येथील अनुकूल परिस्थिती पाहून इंग्रजांनी १ जानेवारी, १६६७ रोजी धरणगाव येथे ईस्ट इंडिया कंपनीची वखार स्थापन केली. धरणगावातील ही वखार भरभराटीला आली. इंग्रजांना खूप मोठा आर्थिक फायदा मिळू लागला, म्हणून सुरक्षेसाठी ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचे सशस्त्र सैन्य ठेवण्यास सुरुवात केली.
इंग्रज व्यापारी उर्मट झाले, ते देशविघातक कारवाया करू लागले. स्वतःचे सशस्त्र सैन्य ठेवून इंग्रज हे प्रबळ होत चालले आहेत.
सन १८१८ मध्ये इंग्रजांनी या भागाची देखरेख करण्यासाठी कॅप्टन ब्रिग्ज या अंमलदाराची नेमणूक करण्यात आली. त्या काळात धरणगाव हे सुजलाम सुफलाम असे गाव होते. त्यामुळे या गावाला भिल्ल व पेंढारी टोळ्यांचा इंग्रजांना उपद्रव वाटत होता. धरणगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सन १८२५ मध्ये इंग्रजांनी आर्मी हेडक्वार्टर उघडले आणि सर जेम्स औट्रम या अंमलदाराची नेमणूक केली. या अंमलदाराने भिल्ल लोकांच्या पलटणी उभारल्या. त्याने याच मार्गातून या टोळ्यांचा बंदोबस्त केला. औट्रम हा धरणगावी सन १८२५ ते १८३५ या काळात अंमलदार होता. त्याचा बंगला ज्या ठिकाणी होता, त्या जागेवर १९१४ मध्ये पी.आर. हायस्कूलची इमारत उभी राहिली आहे. या जागेवर इंग्रज सरकारने औट्रामचा स्मारक स्तंभ उभारला होता, त्यावर लिहिले होते. या जागी लेफ्टनंट औट्रम हे पुढे लेफ्टनंट सरजेम्स औट्रम जी.बी.सी. बार्ट डी.सी.एल. या नावाने प्रसिद्धीस आले. त्याचा राहण्याचा बंगला होता व ते त्या बंगल्यात सन १८२५ पासून ते १८३५ पर्यंत राहत होते. हे गृहस्थ त्यावेळी २३ व्या मुंबईच्या देशी पायदळ पलटणीत लेफ्टनंटच्या हुद्द्यावर होते. त्यांस खान्देश जिल्ह्याच्या ईशान्य भागाचे भिल एजंट नेमले होते व त्यांनी आपल्या ठाण्याच्या जागेसाठी धरणगाव पसंत केले होते.'
बरीच वर्षे हा स्तंभ हायस्कूलच्या क्रीडांगणावर अभिमानाने उभा होता. पुढे नगरपालिकेचे अद्ययावतीकरण करताना हा स्तंभ तोडण्यात आला. स्तंभाचा भाग नगरपालिकेसमोरच्या अशोक स्तंभ उभारण्यासाठी वापरला गेला, तर औट्रामच्या सन्मानार्थ कोरण्यात आलेला शिलालेखाचा भाग नगरपालिकेच्या मागच्या भागात टाकून देण्यात आला.
गेल्या १५ दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे काम करताना, याच शिलालेखाचा भाग आढळला आहे. इंग्रजी सत्तेचा ‘पाडाव’ केल्याने या शिलालेखाचा ‘पडाव’ केला गेला असावा.
कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इमारतही अशीच जमीनदोस्त करण्यात आली, पण या शिलालेखाच्या निमित्ताने पुन्हा एकदा औट्रामचे खान्देशातील कार्याला उजाळा मिळाला आहे. औट्रमला खान्देशातील भिल्ल टोळ्यांच्या बंदोबस्तासाठी नेमले होते. त्यासाठी त्याने भिल्लांचीच एक हत्यारबंद फौजेची तुकडी तयार केली होती. दोन वर्षांतच तिला निष्णात बनविले.
इंग्रजांचे आर्मी हेडक्वार्टर धरणगावला १८२५ ते १८९७ पर्यंत म्हणजे ७२ वर्ष होते. १९०१ साली इंग्रजांनी खानदेशचे पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे
दोन भाग केले. पूर्व भागातील जिल्ह्याचे ठिकाण म्हणून जळगावची निवड केली. त्यामुळे धरणगावचे आर्मी हेडक्वार्टर हे जळगावला हलविण्यात आले. धरणगावची इंग्रजांची वखार असलेली इमारत हळूहळू ढासळू लागली. पुढे या इमारतीला ‘भुशी ग्राउंड’ असे नाव पडले. आता गेल्या काही वर्षांपासून धरणगावला ओव्हर ब्रिज तयार करण्यात आला, त्यामुळे ही इमारत पाडण्यात आली.
डॉ.संजीवकुमार सोनवणे, धरणगाव.