कळमसरे येथे ब्रिटिश राजवटीत रायफलीने हवेत गोळीबार करून पोळा सणाचे उद्घाटन झाल्याची घोषणा गावाचे पोलीस पाटील करीत असत. बैलांची आभूषणे शेतकरी स्वत: घरच्या घरी तयार करीत. सूत, अंबाडीपासून बैलांचे दोर, रेशीमपासून मऊ असे गोंडे बनविले जायचे. गाव कामगार गाव दरवाज्याला आंब्याच्या पानांचे तोरण बांधत असत. गावाबाहेर सजविलेले बैल एका ठिकाणी जमवीत. ज्याच्या बैलाने तोरण तोडले, त्याच्या हस्ते पोळा फुटला असे समजले जाई.
गावात एकही घर पोळा सणापासून वंचित राहणार नाही याची काळजी गल्लीतील रहिवासी घेत असत. यातून सामाजिक बांधिलकी, बंधुप्रेम, एकात्मतेची भावना जागृत होत असे. सायंकाळी गावातील बारा बलुतेदारांना घरोघरी पोळ्याची खुशाली म्हणून आर्थिक मदत केली जात असे. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, लहान वासरं यांना पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी रंगरंगोटीने सजविले जाई. आता मात्र ही प्रथा लोप पावली असून, जो तो आपल्या मर्जीनुसार पोळा सण साजरा करतो.
पाडळसे व बोहरे येथे गावातील सर्व मंदिरांना प्रथम सजविलेल्या बैलांना प्रदक्षिणा घातली जात असे. तापी काठावरील निम येथे गाव दरवाज्याला बांधलेले नारळाचे तोरण तोडून पोळा सणाला सुरुवात होत असे. पांझरा काठावरील शहापूर गावी बैलांचा पोळा सण सर्व समाज मिळून एकत्रितपणे साजरा करीत असत.