लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या संथ कामामुळे या भागातील नागरिक वैतागले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणने १५ ऑगस्टपर्यंत विद्युत खांबाचा अडथळा दूर करून, कामाला सुरुवात केली नाही. तर प्रत्येक नागरिकाकडे जाऊन पैसे जमा करून, विद्युत खांब हे लोकवर्गणीतून उभारलेल्या निधीतून हटविण्यात येतील, असा इशारा शिवाजीनगर भागातील नगरसेवकांनी दिला आहे.
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या लांबत जाणाऱ्या कामामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागत आहे. तब्बल अडीच वर्षांपासून नागरिक त्रास सहन करत आहेत. तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मात्र या कामाकडे लक्ष देताना दिसून येत नाही. त्यामुळे शिवाजीनगर भागातील आठ नगरसेवकांनी शुक्रवारी बैठक घेऊन जर महावितरणने १५ ऑगस्टपर्यंत विद्युत खांब हटविले नाही तसेच बांधकाम विभागानेदेखील उर्वरित कामाला सुरुवात केली नाही तर या कामासाठी सर्व नगरसेवक हे या भागातील नागरिकांकडे जाऊन, या कामासाठी निधी उभारून महावितरणला देतील, अशी भूमिका आता नगरसेवकांनी घेतली असल्याची माहिती नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली.
‘तो’ निधी वर्ग करण्यास पुन्हा आले विघ्न
१. विभागीय आयुक्तांनी विद्युत खांब हटविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा मनपाने पाठविलेला प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर हा प्रस्ताव मनपाने आता राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास उशीर होऊ शकतो व त्यामुळे कामालादेखील उशीर होईल. यासाठी मनपा प्रशासनाने महावितरणला आपल्या फंडातून दीड कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शविली होती.
२. हा निधी मनपाने वर्ग केल्यानंतर महावितरणला हे काम लवकर सुरू करण्याचा प्रस्ताव मनपाने दिला होता. तसेच वीज बील किंवा अन्य कामासाठी हा निधी नंतर महावितरणे मनपाकडे वर्ग करावा, अशीही तयारी मनपाने केली होती. मात्र, हा निधी परत देताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतील, असे कारण महावितरणने दिल्यामुळे पुन्हा आता हा प्रस्ताव देखील रेंगाळला आहे. आता विद्युत खांब हटविण्यासाठी शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची वाट पहावी लागणार आहे.
डिसेंबरपर्यंत पुलाचे काम होणे अशक्य ?
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गेल्या महिन्यात या पुलाच्या कामाची पाहणी केली होती. तसेच पुलाची पाहणी केल्यानंतर मक्तेदाराला डिसेंबरपर्यंत पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत विद्युत खांब हटविण्याची प्रक्रिया पाहता डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे.