जळगाव : तहसील कार्यालयाकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पादचारी पूल उभारण्याबाबत मनपाने प्रस्ताव दिल्यास रेल्वेतर्फे पूल उभारण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे, तसेच ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगदा उभारण्याबाबत रेल्वेतर्फे मनपाला पावणेसहा कोटींचे अंदाजपत्रक पाठविण्यात आले आहे. याबाबत मनपातर्फे कुठलेही उत्तर रेल्वेला मिळाले नसल्याचे कळविण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्यायी रस्त्याच्या मागणीबाबत गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी पाठविलेल्या पत्राला रेल्वेने आता चार महिन्यांनंतर उत्तर दिले आहे. गुप्ता यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामामुळे शिवाजीनगरवासीयांना तहसील कार्यालयाकडून रेल्वे रूळ ओलांडून वापर करावा लागत आहे. रुळ ओलांडताना अपघाताची भीती असल्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याबाबत गुप्ता यांनी रेल्वेकडे पत्रव्यवहार केला होता. यावर रेल्वेच्या मुख्य वाणिज्य निरीक्षकांनी तहसील कार्यालयाजवळ पादचारी पूल उभारण्यासाठी मनपाने प्रस्ताव दिल्यास निर्णय घेणार असल्याचे कळविले आहे. दरम्यान, पादचारी पुलासाठी खर्चाबाबत रेल्वेने कुठलीही माहिती दिलेली नाही.
तसेच ब्राम्हण सभेजवळ भुयारी बोगद्याबाबत ५ कोटी ७७ लाखांचा प्रस्ताव मनपाकडे पाठविला आहे; मात्र याबाबत मनपाकडून या कामाबाबत कुठलेही उत्तर मिळाले नसल्याचेही रेल्वेने कळविले आहे.
इन्फो :
लेंडी नाल्याबाबत समाधानकारक उत्तर नाही
दीपक कुमार गुप्ता यांनी लेंडी नाला येथील रेल्वे रूळावरून गाडी जात असताना गाडीमधील पाणी जमिनीवर पाझरते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्याबाबत गुप्ता यांनी मागणी केली असता, रेल्वे प्रशासनातर्फे पावसाळ्यात रूळावरील पाणी खाली येण्याकरिता, खडी टाकण्याऐवजी मोकळे अंतर ठेवण्यात आले आहे, तसेच हा हायड्रोलिक पूल असल्याचे सांगत, ठोस उपाययोजनांबाबत समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले.