कोरोना कमी झाल्याने जिल्हा प्रशासन लक्ष देईल का? : गिरणा पोखरली, आता तापीही पोखरली जातेय
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जिल्ह्यातील वाळू ठेक्यांची मुदत ९ जून रोजी संपुष्टात आली आहे. मात्र, तरीही गिरणा, तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू उपस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असतानादेखील अवैध वाळू उपसा सुरू असल्याने जिल्हा प्रशासन आता तरी या समस्येकडे लक्ष देईल का? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी, बांभोरी, भोकणी या गावांमधील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे सर्व उपसा हा भरदिवसा होत असतानाही जळगाव तहसीलदार असो वा धरणगाव तालुक्यातील तहसीलदार कोणीही या अवैध उपस्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. काही पर्यावरण संस्था व गिरणा बचाव कृती समितीकडूनदेखील जिल्हा प्रशासनाला अवैध वाळू उपस्याबाबत अनेकवेळा तक्रारी करून देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही.
जिल्हधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅनवर कार्यवाही नाहीच
सप्टेंबर २०२० मध्ये आव्हाणे येथील शेतकऱ्यांनी जल सत्याग्रह केल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आव्हाणे व परिसरातील वाळू उपसा रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला होता. मात्र, हा ॲक्शन प्लॅन नावालाच ठरला आहे. नदीपात्रात जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र, काही दिवसात वाळू माफियांनी रस्ते पुन्हा सुरू केले. आव्हाणे ग्रामपंचायतीला सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, सीसीटीव्ही बसविण्यातच आलेले नाहीत. तसेच ठिकठिकाणी महसूल व पोलीस प्रशासनाच्या चौक्या उभारण्यात येणार होत्या. मात्र त्या देखील उभारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा प्लॅन हा केवळ कागदावरच आहे.
तापी नदीही पोखरण्यास सुरुवात
आतापर्यंत वाळू माफियांकडून गिरणा नदीतूनच उपसा केला जात होता. गिरणा नदीतील वाळूला मोठी मागणी असल्याने याच नदीतून मोठ्या उपसा होत होता. मात्र, आव्हाणे, आव्हाणी या परिसरात आता खडक लागायला सुरुवात झाली आहे. तर अनेक गावांमधून उपस्याला विरोध असतो, त्यामुळे वाळू माफियांनी आपला नजरा तापी नदीकडे वळविल्या असून, विदगाव, कठोरा, किनोद, सावखेडा, भोकर या भागातून मोठ्या प्रमाणात उपसा सुरू झाला आहे. विदगावबाहेरील तापी नदीच्या पुलाखालूनदेखील उपसा वाढल्याने या पुलालादेखील धोका निर्माण झाला आहे.