लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून झालेल्या व्हेंटिलेटर, कॉन्सेंट्रेटर व मेमोग्राफी मशीन खरेदीवरून अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार रणजित कांबळे यांच्यासह सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. आपत्ती व्यवस्थापनातून केवळ कोविडच्या उपाययोजना अपेक्षित असताना मेमोग्राफी मशीन का खरेदी करण्यात आले, अशी विचारणा त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांना केली.
कोट्यवधी रुपयांच्या या विविध खरेदीच्या तक्रारींबाबत आमदार रणजित कांबळे तसेच आमदार रईस शेख यांनी विचारणा केली. यावर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आला असून, त्याचा एकत्रित अहवाल सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
रुग्ण किती, एमडी डॉक्टर किती
मेमोग्राफी मशीन हे मुख्यालयात न ठेवता ग्रामीण रुग्णालयात का ठेवण्यात आले? मशीनचा उपयोग काय याबाबत समितीने विचारणा केल्यानंतर स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने याची खरेदी केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. मात्र, त्यांना रुग्ण किती तसेच एमडी डॉक्टर किती याची विचारणा समितीने केली. यासह रेडिऑलॉजिस्ट नसतानाही या मशिनरीची खरेदी का केली असे आमदार कांबळे तसेच आमदार शेख यांनी विचारणा केल्यावर आता आपण त्यांची नियुक्ती करणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
समितीत तज्ज्ञ का नाहीत
व्हेंटिलेटर खरेदीच्या तक्रारीबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीत भांडारपाल, लिपिक यांचा समावेश होता. यात तज्ज्ञ डॉक्टरांचा का समावेश करण्यात आला नाही, अशी विचारणाही समितीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांना केली. तसेच या सर्व प्रकरणांचा एकत्रित अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिल्या.