डिगंबर महाले
अमळनेर : महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अमळनेरातील अर्ध पुतळ्यास १० रोजी ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबाबतची बहुतांश जणांना माहिती नाही.
पालिकेने १० जुलै १९४९ रोजी सुभाषचंद्र बोस यांचा अर्ध पुतळा तत्कालीन लोकल बोर्ड विहिरी जवळच्या चौकात बसविला. पुतळ्याच्या अनावरण समारंभ दिनी रविवार होता. सायंकाळी साडेपाच वाजता अमळनेर माजी नगराध्यक्ष बाबासाहेब भालेराव यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. समारंभास मोठ्या संख्येने प्रतिष्ठित मंडळी, पालिकेचे सभासद हजर होते.
नगरपरिषद बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष मोरोपंत ब्रह्मे यांनी या चौकाला सुभाष चौक व स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याला नेताजी रस्ता असे नाव दिल्याचे जाहीर केले. भालेराव यांनी सुभाष चंद्र बोस यांचे पावित्र्य, त्याग, धडाडी, देशभक्तीबद्दल माहिती सांगितली. अशा महान आत्म्यांचे पुतळे हे समाजाला व नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे व त्यांचे पावित्र्याचा उज्वल इतिहास डोळ्यासमोर ठेवण्यास कारणीभूत कसे होतात याविषयीही माहिती सांगितली.
पाश्चिमात्य देशात विशेषत: रोम शहरात निरनिराळ्या कलांचे प्रतीक म्हणून पुतळे उभारण्याची पद्धत कशी आहे, याबद्दलही त्यांनी माहिती दिली. प्रताप हायस्कूलमधील तत्कालीन कलाशिक्षक पोद्दार यांनी हा पुतळा तयार केला होता. आकर्षक पुतळा बनवल्याबद्दल त्यांचा अध्यक्षांच्या हस्ते चांदीचा करंडक देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले. खान्देशच्या इतिहासात प्रथमच मुख्य चौकात सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय अमळनेर नगर परिषदेला देण्यात येते. सुभाषबाबू यांचा अर्धपुतळा बसविल्याबद्दल ब्रम्हे यांचे अभिनंदन करण्यात आले. वंदे मातरम हे गीत होऊन समारंभाचा समारोप झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अमळनेर नगरीचे एक वैभव म्हणून त्याकडे आजही पाहिले जाते.
फोटो ओळ- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अमळनेर येथील अर्धपुतळा.