भुसावळ : शहरासह तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस आला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. साकेगाव येथील गोसावी वाड्यामध्ये नाल्या तुडुंब झाल्याने पाणी थेट घरांमध्ये शिरले होते . यामुळे रहिवाशांचे खूपच हाल झाले.
शहरासह ग्रामीण भागामध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने नाले तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने काही घरातील साहित्याचे नुकसानही झाले. शहरातील पंचशीलनगर, खडका रोड , भोईनगर परिसर आदी सखल भागांमध्ये सर्वत्र पाणी साचलेले दिसून आले.
साकेगाव झाले हाल
साकेगाव येथील गोसावी वाड्यातून जाणाऱ्या नाल्या सारख्या गटारी तुडुंब भरल्यामुळे अतिवेगाच्या पाण्यामुळे लाला गोसावी यांच्यासह अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसले होते. घरातील बाहेर पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली.
साकेगाव नालेसफाई होणे गरजेचे
गेल्या अनेक वर्षांपासून येथील नालेसफाई झालेली नाही, नाल्यालगत संपूर्ण काटेरी झुडपांनी परिसर वेढला गेला असून नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकसह गाळ असल्यामुळे भविष्यात अशाच प्रकारे जोरदार पाऊस आला तर गावात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.