लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्याच्या अनेक भागात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतीवाडीचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. धरणगाव येथे वादळी वाऱ्यामुळे झाड आणि विजेचे खांब कोसळले. पावसामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. टोणगाव येथे गारांचा पाऊस झाला.
धरणगाव येथे दुपारी तीन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मोठा माळीवाडा, रामलीला चौक या ठिकाणी झाड कोसळले. ही झाडे नेमकी वीज खांबावर कोसळली. यामुळे मोठ्या प्रमाणावर शॉर्ट सर्किट झाल्याने या भागातील नागरिकांच्या घरातील फ्रीज, टीव्ही यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एक झाड चारचाकी वाहनावर आदळले.
सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. या ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. खेडगाव ता. भडगाव येथे पाच मिनिटे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. भडगाव परीसरातील टोणगाव शिवारात १० मिनीटे गारासह पाऊसही झाला.
पहूर येथे पाऊस
पहूर ता. जामनेर येथे सोमवारी अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात काही वेळ गारवा जाणवत होता. मात्र या पाऊसाने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.