गुलालाची उधळण, फटाक्याची तयारी अन् पराभवाचा आला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:19 AM2021-01-19T04:19:39+5:302021-01-19T04:19:39+5:30

जळगाव : शिरसोली प्र. बो. येथील प्रभाग क्रमांक सहामधील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव जागेवर अगोदर विजयी घोषित केलेल्या उमेदवारांना ...

Gulala's scattering, firecracker preparation and the message of defeat came | गुलालाची उधळण, फटाक्याची तयारी अन् पराभवाचा आला संदेश

गुलालाची उधळण, फटाक्याची तयारी अन् पराभवाचा आला संदेश

Next

जळगाव : शिरसोली प्र. बो. येथील प्रभाग क्रमांक सहामधील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव जागेवर अगोदर विजयी घोषित केलेल्या उमेदवारांना नंतर कमी मते असल्याचे सांगून प्रतिस्पर्धी उमेदवाराला विजयी घोषित केले. यावर उमेदवार हर्षदा किशोर अस्वार यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करीत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, हर्षदा अस्वार यांना अधिक मते असल्याचे समजल्याने बाहेर गुलालाची उधळण करण्यात आली व फटाके फोडण्याची तयारीदेखील केली जात होती. त्याचदरम्यान त्यांना पुन्हा बोलविण्यात आले व त्यांना कमी मते असल्याचे सांगत प्रतिस्पर्धी उमेदवाराला विजयी घोषित केले.

शिरसोली प्र.बो. येथील प्रभाग क्रमांक सहामधील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागात हर्षदा किशोर अस्वार, श्रद्धा प्रशांत काटोले व मनीषा दीपक काटोले उमेदवार होत्या. यात हर्षदा अस्वार यांना एकूण ४६८ मते मिळाल्याचे सांगण्यात आल्याने त्याच विजयी असल्याचे गृहीत धरण्यात आले व बाहेर त्यांचे पती किशोर अस्वार यांच्यासह समर्थकांवर गुलालाची उधळण करण्यात आली.

आक्षेप नसताना पुन्हा बोलविले

मतमोजणी झाल्यानंतर हर्षदा अस्वार यांना पुन्हा मतमोजणी कक्षात बोलविण्यात आले व त्यांना ४६४ मते मिळाली असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दोन्ही फेऱ्यांधील बेरीज ४६८ होते, असे अस्वार यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांना ४६४ मते मिळाल्याचे सांगण्यात आल्याने श्रद्धा प्रशांत काटोले यांना ४६६ मते असल्याने त्यांना प्रशासनानेही त्यांना विजयी घोषित केले. या संदर्भात अस्वार यांनी फेरमतमोजणीची मागणी केली असता ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

या संदर्भात अस्वार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून कोणतीही फेरमतमोजणीची मागणी नसताना पुन्हा का बोलविण्यात आले, असा सवाल केला. तसेच मलादेखील नाईलाजास्तव फेरमतमोजणीची मागणी करावी लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या प्रभागात फेरमतमोजणी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी अस्वार यांनी केली आहे. ती मान्य न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

भाजपच्या महिला तालुकाध्यक्षांचाही आक्षेप

शिरसोली प्र.बो. येथील प्रभाग क्रमांक सहा मधीलच नामप्र महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा वर्षा प्रकाश बारी या सहा मतांनी पराभूत झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शीतल राजेंद्र खलसे या विजयी झाल्या असून त्यांना ४०२ तर वर्षा बारी यांना ३९६ मते मिळाली आहेत. बारी यांनी या संदर्भात आक्षेप घेत फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांचीही मागणी फेटाळ‌ण्यात आली.

———————

शिरसोली प्र.बो. येथील फेरमतमोजणीची मागणी ही मतमोजणीनंतर मतदान यंत्र सीलबंद करण्यापूर्वीच करायला हवी होती. ती एक ते दीड तासाने करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती नाकारली.

- नामदेव पाटील, तहसीलदार.

Web Title: Gulala's scattering, firecracker preparation and the message of defeat came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.