लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडा प्रकार बंद झाले होते. नंतरच्या काळात ऑक्टोबरपासून खेळांना सुरुवात झाली आहे. सध्याच्या शहरातील शिवतीर्थ मैदान, जिल्हा क्रीडा संकुल, सागर पार्क, छत्रपती संभाजी राजे मैदान गर्दीने फुलून जात आहे. येथे दररोज विविध क्रीडा प्रकारांचा सराव केला जातो. तसेच स्पर्धादेखील घेतल्या जात आहेत.
जिल्हा क्रीडा संकुल
शहराच्या मध्यभागी असलेल्या या मैदानात क्रिकेट वगळता इतर सर्व खेळांच्या सुविधा आहेत. त्यात सध्या सॉफ्टबॉलचा सराव केला जातो. त्यासोबतच दररोज सकाळी आणि सायंकाळी जवळपासच्या गावांमधून पोलीस भरती आणि इतर सशस्त्र दलांच्या भरतीसाठी तरुण सरावाला येतात. त्यासोबतच ॲथलेटिक्सच्या विविध क्रीडा प्रकारांचा सराव या मैदानावर होत असतो.
सागर पार्क
गेल्या काही दिवसांपासून सागर पार्क क्रिकेटचे सामन्यांनीच गजबजलेले असते. या आधी या मैदानावर मराठा प्रीमियर लीगचे सामने घेण्यात आले. तर सध्या तेथे रोटरी प्रीमियर लीगचे सामने सुरू आहेत. त्याशिवाय स्पर्धा नसताना या मैदानावर फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी असते तसेच सकाळी क्रिकेटचे सामनेदेखील होतात.
शिवतीर्थ मैदान
शिवतीर्थ मैदानावर एकता मराठा प्रीमियर लीगचे आयोजन नुकतेच पार पडले. त्यासोबतच तेथे सध्या दिवसभर क्रिकेट खेळणाऱ्यांची गर्दी असते. त्यासोबतच अनेक जण सकाळी या मैदानात फेरफटका मारण्यासाठी येत असतात.
छत्रपती संभाजी राजे मैदान
नाट्यगृहाच्या बाजुलाच असलेल्या या मैदानावर चांगली खेळपट्टी आहे. विविध क्लबचे खेळाडू या मैदानाची देखभाल देखील करतात. त्यामुळे या मैदानावर सकाळी आणि सायंकाळी क्रिकेटचे सामने रंगलेले असतात.
एकलव्य क्रीडा संकुल
एकलव्य क्रीडा संकुलात दररोज ॲथलेटिक्सचे विविध क्रीडा प्रकारांचा सराव सुरू असतो. त्यासोबतच तेथे नेट्सवर क्रिकेटचे देखील धडे दिले जातात. जिम्नॅशिअम हॉलसह विविध सुविधांवर खेळाडू सराव करत आहेत.
नूतन मराठा महाविद्यालयाचे मैदान
नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर व्हॉलिबॉलचा सराव गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाला आहे. यात पासिंग व्हॉलिबॉल संघटनेने पुढाकार घेत या खेळाचा सराव या मैदानावर सुरू केला आहे.