मनपा व मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम : सयाजी शिंदे यांच्या हस्ते होणार शुक्रवारी उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिरवाई’ या प्रकल्पांतर्गत मेहरुण तलाव परिसरात एक हजार एक झाडे लावली जाणार आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा हस्ते केले जाणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, महापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मराठी प्रतिष्ठानचे विजय कुमार वाणी, अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे आदी उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठान यांच्यात ‘हिरवाई’ प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवड व संवर्धनासंदर्भात करारही झालेला आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात निश्चितपणे भर पडणार आहे. त्याअंतर्गत करंज, कडुनिंब, वड, पिंपळ, आवळा, चिंच, अमलतास, बहावा, कदंब आदी विविध जातींच्या रोपांचा समावेश आहे. या १००१ झाडांसाठी संपूर्णपणे खड्डे खोदून रोपट्याला काटेरी कुंपण टाकण्याचे कामही नियोजनपूर्वक सुरू झालेले आहे. शहराच्या सौंदर्यीकरणाच्या या अभिनव प्रकल्पाच्या प्रारंभावेळी जळगावकर वृक्षप्रेमींनी मेहरुण तलावाकाठच्या चौपाटीवर आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिका व मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, ‘मराठी प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने साकारला जाणारा हा सहावा प्रकल्प आहे.