पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील शेवगे प्र.ब. येथील लोकनियुक्त सरपंचाची कामांची बिले काढून दिली. या बदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक श्याम पांडुरंग पाटील (रा.संत गुलाबबाबा कॉलनी, पारोळा) यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. पारोळा पंचायत समितीसमोर गुरुवारी दुपारी एकला ही कारवाई करण्यात आली.सूत्रांनुसार, शेवगे प्र .ब. येथील सरपंच यांनी शेवगे प्र.ब. येथे २०१८ रोजी स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या शौचालयाचे बांधकाम केले होते. तसेच सन २०१९ साली शेवगे प्र.ब. ग्रामपंचायतीमार्फत शेवगे प्र.ब. तांडा येथील विहिरीचे गाळ काढण्याचे काम केले होते. दोन्ही कामांची बिले ग्रामसेवक श्याम पाटील यांनी काढली होती. त्यापोटी श्याम पाटील यांनी तक्रारदार सरपंच यांच्याकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीत २५ हजार रुपये देण्याचे ठरले. यादरम्यान, तक्रारदार सरपंच यांनी याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. २७ जून रोजी दुपारी १ वाजता पारोळा पंचायत समितीसमोर असलेल्या गजानन टी सेंटरवर पैसे स्वीकारण्यासाठी सरपंच यांनीशाम पाटील यांना रोख रक्कम दिली. या वेळी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व पथकातील जयंत साळवे, पोलीस नाईक संतोष हिरे, संदीप सरंग, सुधीर सोनवणे यांनी सापळा रचून पैसे स्वीकारताना श्याम पाटील यास रंगेहात पकडले.सरपंचाने ग्रामसेवकाला लाच घेताना पकडून दिले, अशी घटना तालुक्यात पहिल्यांदाच घडली आहे.
पारोळा येथे लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 18:24 IST
लोकनियुक्त सरपंचाची कामांची बिले काढून दिली. या बदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक श्याम पांडुरंग पाटील (रा.संत गुलाबबाबा कॉलनी, पारोळा) यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
पारोळा येथे लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला पकडले
ठळक मुद्देपंचायत समितीसमोरील कारवाईहॉटेलवर स्वीकारली लाच