लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला,वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालयाला बंगळुरूच्या नॅक या अग्रमानांकित संस्थेने ए ग्रेड प्रदान केली आहे. सोमवारी सायंकाळी नॅकने महाविद्यालयाला हे मानांकन दिले. हे महाविद्यालय एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्न आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. ए.पी. चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, महाविद्यालयाने राबवलेल्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी सहायक योजना, सायकल बँक योजना, मुठभर धान्य योजना, सावित्रीबाई फुले वाचक चळवळ, आपली अदालत, निवृत्ती युवा फोरम, अर्थसंकल्पाचे विश्लेषण, अनुवादकी पाठशाळा, रॉक म्युझीयम, भाषा प्रयोग शाळा या सारख्या प्रकल्पांचे नॅकने कौतुक केले. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. बी.एम. महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, नॅक समन्वयक डॉ. सतीश जाधव, नॅक सेक्रेटरी डॉ. एच. व्ही. चव्हाण यांनी परिश्रम घेतल्याचेही चौधरी यांनी नमुद केले. नॅकच्या समितीत प्रा. क्षमा अग्रवाल, अशोक हंजागी, डॉ. संजुक्ता दास यांचा समावेश होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.