धरणगाव : बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर बाबतीत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी झंवर हे माझ्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे निकटवर्तीय आहेत, असे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे या वक्तव्याचे कोणत्याही राजकीय पक्षाने खंडन केले नव्हते. परंतु, आता काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून, ‘गिरीशभाऊ...सब घोडे बारा टक्के नसतात’ असे पाटील यांनी म्हटले आहे. तर महाजन यांनी यापुढे फक्त स्वतः किंवा त्यांच्या पक्षापुरते मर्यादित बोलावे, असा सल्ला पाटील यांनी दिला आहे.
सध्या गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यासंदर्भात ही शाब्दिक जुगलबंदी झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात डेक्कन पोलीस ठाण्यात बीएचआरचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुख्य संशयित सुनील झंवर यास नुकतीच अटक केली. तसेच झंवरच्या कार्यालयात अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित कागदपत्र सापडली होती. तर झंवरला अटक झाल्यानंतर झंवर हे माझ्यासह सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय आहेत, कुणी नाही म्हणून दाखवावं ... असे वक्तव्य आमदार गिरीश महाजन यांनी केले होते. यावर आक्षेप घेत काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, झंवरशी ज्याचे संबंध आहे ते कबूल करतील. परंतु, घोटाळ्यातील संशयितासोबत विनाकारण इतर राजकीय पक्षाचे नाव जोडू नये. खासकरून काँग्रेसच्या बाबतीत तर बोलूच नये. अगदी व्यक्तिगत बोलायचे झाले तर सुनील झंवर हा माझ्या तालुक्यातील असल्यानंतरही ते काळे आहेत की गोरे हे मी पाहिलेले नाही. त्यामुळे झंवरसोबतच्या संबंधांवर महाजन यांनी सर्व पक्षांना गृहीत धरू नये. स्वत:चे संबंध असल्याचे महाजन यांनी मान्य केलेय. परंतु, सब घोडे बारा टक्के असे समजणे चुकीचे आहे. सर्वजण एका माळेचे मनी नसतात. त्यामुळे यापुढे बोलताना महाजन यांनी भान ठेवावे. त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याकडून असे शब्द शोभत नाहीत, असेही पाटील यांनी म्हटले आहे.