सुनील पाटील
जळगाव : वर्चस्वासाठी होत असलेली जीवघेणी स्पर्धा, गँगवार व त्यातून होणारे खून आणि या खुनातून निर्माण झालेली ‘बदले की आग’ घातक ठरत चालली आहे. भावाचा खून केला म्हणून बदल्याच्या भावनेतून दोन दिवसांपूर्वीच शेख समीर जाकीर याने रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन (दोन्ही.रा.पंचशील नगर, भुसावळ) याच्या मदतीने धम्मप्रिय मनोहर सुरडकर हा कारागृहातून जामिनावर बाहेर सुटताच त्याचा खून केला. त्यानंतर गुरूवारी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याचा खून केला म्हणून त्याच्या भावाने आकाश मुरलीधर सपकाळे याचाही खून करण्याचा प्रयत्न गुरुवारी केला. दोन्ही घटनांचे साम्य एकच आहे. आपल्या भावाच्या खुनाच्या बदल्यात खूनच करण्याचा निश्चय असल्याचेच दोन्ही घटनांमधून स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळ माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यात आकाश मुरलीधर सपकाळेसह पाच जणांना अटक झाली होती. यातील सर्व संशयितांना जामीन मिळाला आहे. त्यानुसार आकाशही काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. खरे तर राकेशच्या खुनाची घटना घडली तेव्हाच बाबू व सोनू या दोन्ही भावांनी या खुनातील मारेकऱ्यांना संपविण्याचा निर्धार केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शनी पेठ पोलीस ठाण्यात बाबू सपकाळे याची चौकशी केली तेव्हा हेच मुद्दे समोर आले. बाबू याने तशी स्पष्ट कबुलीच पोलीस अधीक्षकांसमोर दिली. त्यामुळे आकाश कारागृहातून बाहेर केव्हा येतो व गेम करण्यासाठी कोणती वेळ व तारीख योग्य राहील याच्या शोधात सपकाळे बंधू होते. त्यानुसार बाबू याने पहाटे तीन वाजताच विक्कीला फोन करुन आकाशचा गेम वाजवायचा म्हणून सांगून आठ वाजता तयारीत राहण्याचे सूचित केले होते. ठरल्याप्रमाणे आकाशवर हल्लाही झाला, मात्र प्रत्युत्तरात आकाशनेही हल्ला केल्याने त्यात त्याचा जीव वाचला.
पिस्तूल सहज मिळत असल्याने वाढली हिंमत
नशिराबाद महामार्गावर धम्मप्रिया सुरडकर याच्या खुनात गावठी पिस्तुलाचा वापर झाला तर, गुरूवारी कांचन नगरातही दोन पिस्तुलाचा वापर झालेला आहे. त्याशिवाय याच भागात काही महिन्यापूर्वी गोळीबार झाला होता. त्या गुन्ह्यातील लिंबू राक्या या गुन्हेगाराला गेल्याच आठवड्यात पिस्तुलासह पोलिसांनी पकडले. स्थानिक गुन्हे शाखेने यावल तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या एका मुलाकडे पिस्तूल पकडले होते. वर्षभरात पिस्तुलासह अनेक आरोपी पकडले गेले. याचाच अर्थ गावठी पिस्तुलाचा बाजार जिल्ह्यात जोरात आहे. ते सहज व अगदी कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढत चालली आहे. जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले उमर्टी (मध्य प्रदेश) हे पिस्तूल निर्मितीचे मुख्य केंद्र आहे. त्याशिवाय भुसावळ व जळगाव येथून रेल्वेची सुविधा असल्याने तस्करीला मोठा वाव आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा महासंचालक यांच्याकडून शस्त्राबाबत मोहीम राबविण्याचे आदेश येतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात शस्त्र पकडले जातात, हे देखील तितकेच खरे आहे.
कायद्याचा धाक संपला की आणखी....
कुटुंबातील सदस्याच्या खुनाचा बदला खुनानेच घ्यायचा, हा दोन गट, कुटुंब व समूहाशी निगडित विषय आहे, त्यामुळे त्याची कल्पना पोलिसांना असेलच असे नाही. असे असले तरी गँगवारमधील घडामोडीची माहिती गुन्हे शोध पथक असेल किंवा स्थानिक गुन्हे शाखेला असू नये यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही. या गुन्हेगारांना खरंच कायद्याचा धाक उरला नाही का?, असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. खुनाच्या गुन्ह्यात वर्षभरात आरोपी जामिनावर बाहेर पडू लागले, शस्त्राच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची देखील हीच गत आहे. न्यायव्यवस्था व पोलीस यंत्रणा यांचा धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याचे या दोन घटनांमधून सिद्ध होत आहे.