लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात तरुण-तरुणी पळून जाण्याचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. अवघ्या पंधरा दिवसात १ ते १५ सप्टेंबरदरम्यान बारा तरुण-तरुणी पळून गेल्याने पालकवर्ग चिंतेत पडला आहे.
तालुक्यातील पिंपळे येथून २८ वर्षीय भूषण देवीदास पाटील १४ रोजी सकाळी, तर २० वर्षीय तरुणी १३ रोजी दुपारी दीड वाजता घरातून निघून गेले आहेत. तालुक्यातील निमझरी येथील २३ वर्षीय तरुणी १४ रोजी घरातून निघून गेली. ढेकू रोडवरील देशमुखनगरमधील तरुणी १३ रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास निघून गेली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी येथील २३ वर्षीय तरुण पवन कैलास पाटील ९ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर बसस्थानकावरून बेपत्ता झाला आहे. शारदा कॉलनीतील २२ वर्षीय विवाहिता २ रोजी घरातून निघून गेली, तर शनिपेठ, पैलाड येथील २३ वर्षीय तरुणी १ रोजी रात्री घरातून निघून गेली आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील आणखी पाच तरुण-तरुणी घरातून बेपत्ता झाल्याचे समजते; परंतु पालकांनी पोलिसात खबर देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यातील काही तरुण-तरुणी विवाह करून परतले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसदेखील तीन ते चार तरुण-तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्यात महिनाभरात १२ तरुण-तरुणी पळाले होते; मात्र या महिन्यात ती संख्या २०च्या आसपास झाली आहे. पालकांची चिंता वाढली आहे.
गेल्या महिन्यात तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटनाही घडली होती. अल्पवयीन मुलांना पळून गेेल्याबद्दल शिक्षाही करता येत नाही त्यामुळे गुन्हा घडूनही कायद्यामुळे अधिकारी हतबल होतात. दिवसेंदिवस कौटुंबिक समस्याही सामाजिक समस्या बनत चालली आहे. संस्कार आणि मूल्यांचा ऱ्हास झाल्याने, शाळेतील शिस्तीला कायद्याने आडकाठी केल्याने शिक्षकांचे हात बांधले गेले आहेत, तर सोशल मीडियावरील चित्रफिती व चित्रांना बंदी नसल्याने तरुणाई वाईट मार्गाकडे आकर्षित होत आहे.