वाकोद, ता. जामनेर : जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. अशातच पावसाने पूर्णत: वाट लावल्याने गैरोसोयीचा कळस झाला. याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘दणका’ दिल्यावर या रस्त्याच्या कामास चांगली चालना मिळाली आहे.रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाल्याने या ठिकाणी वेळोवेळी वाहतूक ठप्प होत होती. या रस्त्यावर जागो जागी मोठ मोठे खड्डे पडले असून शनिवार संध्याकाळी वाकोदसह परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने वाकोदच्या नाल्याला पुर आल्याने ठेकेदारा कडून बनविण्यात आलेला कच्चा पुल पाण्यात वाहून गेला होता. त्यामुळे वाकोद गावचा संपर्क तूटला होता. दोन्ही बाजुंनी वाहनाच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. रातोरात युद्धपातळी वर काम करुन या रस्त्याची दुरुस्ती करून रविवार दुपार पर्यत वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. या रस्त्या बाबत वाढत्या तक्रारी पाहता नितीन गडकरी यांनी संबंधीत ठेकेदार व अधिकारी यांना आठ दिवसाच्या आत हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची तंबी देताच लागलीच या कामाला गती मिळाल्याचे दिसत आहे.
गडकरी यांच्या तंबीनंतर महामार्गाच्या कामाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:22 IST