चोपडा : येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेमध्ये रिसायक्लर मशीनमध्ये भरणा केलेल्या ५०० रुपयांच्या ६ नोटा अशा एकूण तीन हजार रुपयांंच्या बनावट चलनी नोटा आढळल्याने भरणा करणाऱ्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दि.८ रोजी ग्राहक कांतीलाल प्रेमलाल गुजर याने ॲक्सिस बँकेच्या शाखेत असणाऱ्या रिसायक्लर मशीनमध्ये ५०० रुपयाच्या १७ नोटा याप्रमाणे एकूण ८ हजार ५०० रु.चा भरणा केला. मात्र खात्यावर फक्त ५ हजार ५०० रु.च जमा झाल्याचा बँकेकडून मेसेज आल्याचे त्यांनी बँक अधिकाऱ्यास विचारणा केली. त्यावेळी बँक खात्याची तपासणी केली असता फक्त ५५०० रुपये जमा झाल्याचे व रु.३००० रक्कम जमा झाली नसल्याचे निदर्शनास आले. सीएमएसचे लोक रिसायक्लर मशीन उघडल्यावर नक्की काय झाले हे समजेल, असे संबंधित ग्राहकाला उपशाखा व्यवस्थापक तुषार संतोष पाटील यांनी सांगितले.
तद्नंतर दि.९ रोजी सीएमएस कंपनीचे कर्मचारी बँकेत आले असता त्यांनी रिसायक्लर मशीन उघडून बघितले असता बनावट नोटांच्या बकेटमध्ये ५०० रुपयाच्या ६ नोटा अशा एकूण ३ हजार रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. या नोटांना यू.व्ही. मशीन व नोट सॉर्टिंग मशीन्समध्ये परत तपासणी केली असता त्या सहा नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. या बनावट नोटा कांतीलाल प्रेमलाल गुजर, रा.निमगव्हाण,चोपडा यांनी जाणीवपूर्वक खऱ्या भासवून चलनात आणल्या म्हणून कांतीलाल प्रेमलाल गुजर यांच्याविरुद्ध ॲक्सिस बँक उपशाखा व्यवस्थापक तुषार संतोष पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे भाग ५ गुरनं २६०/२०२१ भादंवि कलम ४८९ ब ,४८९ क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे हे करीत आहेत.