जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने नॅक पुनर्मूल्यांकनासाठीची तयारी सुरू केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात विद्यापीठाकडून पहिला प्रस्ताव नॅककडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुनर्मूल्यांकनासाठी नॅककडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यापीठाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वयंमूल्यांकन अहवाल देखील लवकरचं पूर्ण होणार आहे. दरम्यान, 'आयआयक्यूए' हा पहिला प्रस्ताव आता येत्या आठ ते दहा दिवसात नॅककडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर पात्र, अपात्रची प्रक्रिया होईल़ पात्र ठरल्यानंतर स्वयंमूल्यांकन अहवाल विद्यापीठाकडून नॅककडे पाठविण्यात येईल. शेवटी तीन महिन्यानंतर नॅक समितीकडून विद्यापीठाची पाहणी करण्यात येईल. मध्यंतरी कोरोनाच्या पाश्वभूमीवर विद्यापीठात कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असल्यामुळे उर्वरित माहिती गोळा करण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे अहवाल तयार करण्यास विलंब होत होता. मात्र, आता या प्रक्रियेला गती आली आहे.