जळगाव : उन, वारा असो किंवा पाऊस. आगीची घटना असो किंवा शहरातील इतर आपत्कालीन परिस्थिती असो. या सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी मनपाचा अग्निशमन विभाग हा रात्री उशिरादेखील अलर्ट असल्याचे दिसून आले. मनपा इमारतीच्या पाठीमागील गोलाणी मार्केटच्या संकुलात असलेल्या `मनपा अग्निशमन विभागाच्या कार्यालयात`लोकमत प्रतिनिधीने पाहणी केली असता, एक कर्मचारी जागा असलेला दिसून आला, तर इतरही कर्मचारींही कर्तव्याचे पालन करित कार्यालयात उपस्थित असलेले दिसून आले.
शहर व परिसरातील आगी सारख्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेचे शहरातील गोलाणी मार्केट, महाबळ कॉलनी व शिवाजी नगर या तीन ठिकाणी अग्निशमन केंद्र आहेत. सध्या अग्निशमन विभागाकडे पाच मोठे व दोन छोटे बंब आहेत. तसेच उंच इमारतीवरील आग विझविण्यासाठी ३५ फुटांपर्यंतच्या पाच सीडी असून, ५० छोटे सिलेंडर आहेत. तर अधिकाऱ्यांसह ५० कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. दरम्यान, `लोकमत` प्रतिनिधीने शहरातील गोलाणी मार्केटच्या संकुलातील केंद्राची पाहणी केली असता, या ठिकाणी दोन चालक, दोन फायरमन व त्यांच्या सोबतीला पुन्हा दोन सहायक फायरमन दिसून आले. यातील एक कर्मचारी टेलीफोन जवळ बसलेला दिसून आला. आगीचा फोन येताच, माहिती देणाऱ्याचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर घेऊन त्या ठिकाणी अग्निशमन बंब पाठविण्याची जबाबदारी या कर्मचावर सोपविण्यात आलेली दिसून आली.
इन्फो :
तयार स्थितीत बंब दोन
`लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत या ठिकाणी तीन बंबांमध्ये पाणी भरून तयार असलेले दिसून आले. तसेच या गाडींवरचे चालकही अग्निशमन कार्यालयात उपस्थित असलेले दिसून आले. पाणी भरण्याची या ठिकाणीच सुविधा असल्यामुळे, अवघ्या अर्धा तासात बंब भरला जात असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
सर्व कर्मचारी जागे :
`लोकमत` प्रतिनिधीने रविवारी रात्री अकराच्या सुमारास केलेल्या पाहणीत एक कर्मचारी टेलीफोन जवळ खुर्चीवर बसलेला होता. तर इतर कर्मचारीही आपसात चर्चा करित होते. तर काही कर्मचारी कार्यालयात बसलेले दिसून आले. सकाळी आठ ते दुपारी चार, दुपारी चार ते बारा व त्यानंतर बारा ते सकाळी आठ असे येथील कर्मचाऱ्यांच्या डयुट्या लावण्यात आलेल्या आहेत. रात्रपाळीच्या डयुटीवर असलेले कर्मचारीदेखील सर्व जण आराम न करता, उर्वरित कर्मचारी हे जागे राहत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
नियम काय सांगतो :
नगरपालिका असो किंवा महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या डयुटीच्या वेळेस सावध राहणे गरजेचे आहे. आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी बंबासह व इतर सर्व साहित्य तयार ठेवणे गरजेचे आहे. तसेच आगीच्या घटना मोठी असल्यास सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्याना घटनेच्या ठिकाणी कर्तव्यावर बोलावणे गरजेचे आहे.
इन्फो :
आगीची घटना असो किंवा इतर कुठलीही आपात्कीन घटना असो, त्यासाठी मनपाचे अग्निशमन विभागातील कर्तव्यावर असलेले कर्मचारी आपले साहित्य तयार ठेवून सदैव जागरूक असतात. घटनेबाबत दुरध्वनी आला की लगेचच कर्मचारी घटनास्थळी जातात. घटना मोठी असल्यास सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यानांही बोलावले जाते.
शशिकांत बारी, प्रमुख, अग्निशमन विभाग, मनपा
शहरातील कार्यालय गोलाणी मार्केट, महाबळ कॉलनी, शिवाजी नगर,
कर्मचारी संख्या ५५
बंब ५ मोठे
छोटे-२
सीड्या ३५ - ५
छोटे सिलेंडर : ५०