लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी २५ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मतदार यादी जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना देखील वेग आला असून, सर्वपक्षीय पॅनलबाबत निर्णय घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोअर कमिटीची बैठक लवकरच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
३१ ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. मात्र, आता मुदत संपल्याने निवडणुकीसाठी तयारीला वेग आला आहे. जिल्हा बँक शिखर संस्था असल्याने तिच्या निवडणुकीसाठी ठराव करण्यासह तर प्रक्रियेस वेळ लागतो. त्यामुळे जिल्हा बँकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला. ज्या टप्प्यावर ही प्रक्रिया थांबली होती, त्या टप्प्यापासून पुढे प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा बँकेसाठी करण्यात आलेले ठराव विभागीय सहनिबंधकांकडे जमा करण्यात आलेले असून आता त्यात केवळ कोणी सभासद मयत असतील, काही बदल असतील, तेवढे बदल करण्यात येणार आहे.
ठराव करण्यावर भर
जिल्हा बँकेसाठी जुनेच ठराव कायम राहणार आहेत. मात्र, काही व्यक्ती ठराव झाल्यानंतर मयत झाले असतील तर त्यांच्याऐवजी इतरांचा ठराव देण्यात येणार आहे. अजूनही सर्वपक्षीय पॅनलबाबत निश्चित निर्णय झालेला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठराव करून घेण्यावर राजकीय पक्षांचा भर आहे. ठराव आपल्याबाजूने राहिल्यास जागावाटपात काही जागा जास्तीच्या मिळविण्यासाठी राजकीय पक्षांचा खटाटोप सुरु आहे.
असा आहे कार्यक्रम
२ सप्टेंबर - प्रारुप मतदार यादी होणार जाहीर
११ सप्टेंबरपर्यंत - प्रारुप मतदार यादीवर आक्षेप घेता येतील.
२० सप्टेंबरपर्यंत -प्रारुप मतदार यादीवर आलेल्या आक्षेपांवर निर्णय देता येतील.
२५ सप्टेंबर - अंतिम मतदार यादी होणार प्रसिध्द