लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : कोरोनाने पुन्हा हातपाय पसरल्यानंतर जळगाव शहरालगतच्या ग्रामीण भागातही आता पॉझिटिव्ह रुग्ण आढळूून येत आहेत. परिणामी जनतेत भीतीचे वातावरण पसरले असून प्रत्येक जण सावधानता बाळगताना दिसत आहे. बऱ्याच ग्रामस्थांनी कामाशिवाय बाधित गावे तसेच शहराशी थेट संपर्क टाळण्यावर भर दिला आहे.
जळगाव शहराशी कायम संपर्कात असणारी नशिराबाद, ममुराबाद, असोदा, भादली, कानळदा, शिरसोली, वावडदा, म्हसावद, वडली, पाथरी, आव्हाणे, भोकर, किनोद, नांद्रा बुद्रुक आदी काही गावे कोरोनापासून फेब्रुवारीपर्यंत दूरच होती. जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना संबंधित सर्व गावांमध्ये एकही बाधित रुग्ण न आढळल्याने ग्रामपंचायत प्रशासन तसेच आरोग्य विभाग काहीसे निर्धास्त होते. मात्र, चार ते पाच महिन्यांच्या कालावधीनंतर बहुतांश ठिकाणी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संबंधित यंत्रणेची आता पाचावर धारण बसली आहे.
आव्हाणे गावापाठोपाठ सावखेडा, ममुराबाद, शिरसोली या गावात पुन्हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाने ग्रामीण भागातही परत धडक दिल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. जळगाव शहर तसेच अन्य बाधित गावांशी नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार, शिक्षण तसेच खरेदी-विक्री व्यवहाराच्या निमित्ताने सातत्याने संपर्कात आल्यानंतरच संबंधितांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, प्रतिबंधित भागात उपाययोजना राबविण्यात काहीशी हयगय होत असल्याची तक्रार होत आहे. संबंधित प्रशासनाने त्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी होत आहे.