पितृ दिन विशेष- बाप असताना मिठी मारून घ्या रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 09:11 AM2021-06-20T09:11:00+5:302021-06-20T09:11:36+5:30

पितृ दिनानिमित्त ज्येष्ठ कवयित्री योगिता पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना.

Father's Day Special- Give a hug while you are a father ... | पितृ दिन विशेष- बाप असताना मिठी मारून घ्या रे...

पितृ दिन विशेष- बाप असताना मिठी मारून घ्या रे...

googlenewsNext


आज फादर्स डे...मदर्स डे,सिस्टर्स दे,डॉटर्स डे सारखाच नातं सेलिब्रेट करण्याचा आजचा दिवस.पण हे नातं जरा वेगळं आहे.वडील म्हटलं की जरब,दरारा,मोठे डोळे,ओरडा असंच काही काही सुरुवातीला डोळ्यांसमोर येतं.नाही का?पण खरंच तसं असतं का?की आपणच पूर्वीपासून या भूमिकेला बंदिस्त करून टाकलंय एका विशिष्ट चौकटीत?
बाप असताना मिठी मारून घ्या रे
आठवण आभास देते स्पर्श नाही
 • सदानंद बेंद्रे या गझलकाराचा हा गाजलेला शेर.बापाला जिवंत असताना एकदा तरी करकचून मिठी मारून घ्या हे सांगणारा.खरंच इतकं कठीण असतं का..असावं का हे?मुलं आईच्या गळ्यात जितक्या सहजपणे पडतात तितक्या सहजपणे वडिलांच्या गळ्यात का बरं पडू शकत नसतील?का मुलं आईशी सहजपणे शेयर करू शकणारी सिक्रेट्स बापापासून मात्र लपवण्यास प्राधान्य देत असतील?बाप म्हटलं म्हणजे खांद्यावर हात ,पाठीवर थाप इतकंच असतं का हो?त्यालाही कधीतरी वाटत असावंच ना बापपणाचं सगळं ओझं उतरवून आतल्या आईपणाला वाट करून द्यावी.कधीतरी हमसून हमसून आत साचलेले कढ कुटुंबासमोर बिनदिक्कत मोकळे करावेत.पण नाही..इतक्या सहजपणे नाही शक्य होत ते.पूर्वीपासून आपण केवळ आईपणाचा गौरव करत गेलो.कथा, कादंबऱ्या,कविता इतकंच काय रोजच्या रोज पाहिल्या जाणाऱ्या मालिका,जाहिराती यातही घराची ,मुलांची काळजी घेणारी दाखवली जाते ती आईच!बाप अनुल्लेखितच राहतो बिचारा.आज फादर्स डे च्या दिवशी स्टेट्सला शेयर केल्या जाणाऱ्या वडिलांसोबतच्या फोटोतही निम्म्याहून अधिक फोटोत बाप जरा अंतर राखूनच उभा राहणार.खरंतर आपणच आखून दिलीए त्याला ही लक्ष्मण रेषा.कितीही वाटलं तरी सहजा सहजी न ओलांडता येणारी.मुलांना होस्टेलला सोडताना किंवा लेकीला सासरी धाडताना त्याचे डोळे अगदीच कोरडेठाक राहात असतीलही पण त्यानंतरच्या रात्रींच्या कित्येक प्रहरातला त्याच्या डोळ्यातून बरसणारा पाऊस मोजता न येणारा असतो.आईसारखे नसेल भरवत तो घास रोजच्या रोज लेकरांना पण पोरांचं जेवून संपलेलं ताट पाहून त्याला आलेली तृप्ती एकदा अनुभवायला हवी.त्याला नसेल जाणवत पिरियड्सच्या वेळी मुलीच्या ओटीपोटात होणारी वेदना पण पॅड आणण्यापासून ते गोळी आणण्यापर्यंतची त्याची धावपळ किती निरागस आणि प्रेमळ असते.मूल पडलं झडलं तर डोळ्यात पाणी आणून मलम लावणारी आई असतेच पण पोर खेळताना बाप आजूबाजूला असला की त्याच्या हाताचा तळवा आधीच तिथे संरक्षण म्हणून पाहोचलेला असतो.आता हळूहळू जरा परिस्थिती बदलते आहे.बाप आणि मुलगा टाळी द्यायला लागलेत एकमेकांना टीव्हीवरच्या फालतू जोकवरही,सिक्रेट बडी म्हणून मुलगीही सांगू लागलीये बापाला तिचे उमलत्या वयाचे स्वप्न.आता डॅडा.. डॅडू करत मुलंही ओढू शकताय गाल बापाचे.पण आज असो किंवा काल किंवा परवा प्रत्येक बापाने मुलांना आपल्यापेक्षा मोठं झाल्याचं स्वप्न पाहातच हयात घालवलेली आहे.खांद्यावर घेतलेल्या मुलाने केस ओढले तरीही त्याच्या चेहऱ्यावरच हसू काही जात नाही.मुलं मात्र वयाने कितीही मोठे झाले तरी घरात बाप असतो तोवर या पांघरूणातच स्वतःला लपेटून असतात.एका मित्राचे वडील वारल्यानंतर आलेल्या त्याच्या वाढदिवसाला त्याचा दुसरा एक मित्र अगदी सहजपणे त्याला म्हटला 'एकाच वर्षात तू दोनवेळा वयाने मोठा झालास अरे..एक आजच्या दिवशी आणि एक तुझे वडील वारले तेंव्हा..!' हो आपण लहानच असतो जोवर बाप नावाचं आभाळ आपल्या डोक्यावर असतं तोवर.कित्येक घरातील बाप आणि मुलांमधले संबंध अजिबातच मोकळेपणाचे नसले तरीही मुलाच्या फ्लॅटच्या हप्त्यासाठी शेत गहाण टाकणारा बापच असतो.मुलाच्या प्रगतीचे पेपरातले फोटो त्याच्या आनंदाश्रूंनी भिजून जातात.मुलगा परदेशात गेल्यावरही बाप त्याच मुलांचं गावातल्या मातीत मागे राहिलेलं बालपण जपणं जास्त पसंत करतो.खरं सांगायचं झाल्यास आई इतकं सोपं नाहीए बापाला शब्दात मांडणं.कथा कविता कादंबरी यांच्या पलीकडे आहे त्याची भूमिका.जराशी दुर्लक्षित,उपेक्षित.तरीही त्याचा विंगेतून येणारा आवाजच तारून नेणार असतो आयुष्याचा फ्लॉप शो होण्यापासून.पूर्ण आयुष्य..पूर्ण आयुष्य बापपणाचं ओझं वागवल्यानंतर शेवटच्या क्षणात मात्र याच बापाचे डोळे लहान मुलाचे होतात,आवाजातल्या जरबेची आर्त वेदना होते.क्षीण नजरेने पाहात पाहात कपाळावर फिरणाऱ्या मुलाच्या हाताला तो आपलं बापपण त्या क्षणी देऊन टाकतो....सोपं नाहीए ना बाप होणं!

- योगिता पाटील, चोपडा

Web Title: Father's Day Special- Give a hug while you are a father ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.