पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी पंकज कोल्हे याने दुपारी विषारी औषध प्राशन केले होते. उलटी झाल्यानंतर पंकजने विष प्राशन केल्याबाबत आईला सांगितले. आईने त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे दोन दिवस उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे त्याला मंगळवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या सहा दिवसांपासून पंकजची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान दुपारी दीड वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता भोळे यांच्या खबरीवरुन शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर करीत आहेत.
आईचा आधार हरपला
पंकज याच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई शशीकलाबाई व विवाहित तीन बहिणी असा परिवार आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यातच एकुलता व घरचा कर्ता मुलगा गेल्याने आईचा आधार हिरावला आहे.