वरणगाव : परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा पाण्यासाठी आकाशाकडे लागलेल्या असून, कोरडवाहू जमिनीतील पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरुवात केली आहे, तर बऱ्याच शेतांतील पिके वाळून चालली आहेत. वरणगाव परिसरातील सुसरी, पिंपळगाव, तळवेल, कठोरा, फुलगाव, अंजनसोंडा, गोळेगाव, आचेगावसह पंचक्रोशीत जवळजवळ ९५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. सर्वांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन शेतीच आहे. परंतु या वर्षी आजतागायत चांगला दमदार पाऊस न झाल्यामुळे पिकांची परिस्थिती जेमतेम आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाचे व उसनवारीसह कर्जाचे लाखो रुपये शेतीमध्ये पीक रूपाने पेरले आहेत. आतापर्यंत अल्पशा पाण्यावर पिकांनी कसाबसा तग धरलेला होता. परंतु आता मात्र पिके कोमेजून चालली असून, पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर पिके उन्हाळ्यासारखी वाळून गेली आहेत, तर शेतकरी वाळलेली पिके वाया गेल्याने त्यांच्याकडे पाहून पाण्यासाठी निसर्गाची करुणा भाकत आहेत. अशीच परिस्थिती दोन-तीन दिवस राहिली तर हंगाम शून्यावर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोळपणी, निंदणीसह पिकांना खते देण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या आहेत. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST