जळगाव : वन दावे प्रलंबित असतानादेखील मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील १४ वन दावेदार शेतकऱ्यांची उभे पिके वनविभागाच्यावतीने उपटून फेकण्यात आल्याचा आरोप करीत हे शेतकरी पिकांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी या वेळी त्यांनी केली.
मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा, कुऱ्हा काकोडा वनक्षेत्रात आदिवासी बांधवांनी शेती करीत तेथे वेगवेगळ्या पिकांची लागवड केली आहे. मात्र वनविभागाच्या जमिनीवर शेती केली जात असल्याच्या कारणावरून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या परिसरातील शेतीतील उभे पिके उपटून टाकल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला. शेतातील ही उपटलेली पिके घेऊन हे शेतकरी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेत न्याय मिळण्याची मागणी केली.