पैसेवारीचा खेळ शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:14 PM2018-09-18T22:14:45+5:302018-09-18T22:15:19+5:30

विश्लेषण- सुशील देवकर

farmers disappointed with crop valuation | पैसेवारीचा खेळ शेतकऱ्यांच्या मुळावर

पैसेवारीचा खेळ शेतकऱ्यांच्या मुळावर

googlenewsNext


जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत जेमतेम ६३.५ टक्केच पाऊस झालेला असताना, त्यातही पावसाने आधी १८ दिवस व नंतर २४ दिवस अशी दोन टप्प्यात दांडी मारल्याने पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम झाला असून उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही जिल्ह्याची नजर पैसेवारी ५० पैशांच्यावर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या पैसेवारीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पैसेवारी ५० पैशांच्यावर असली तर दुष्काळी योजनांचा लाभ शेतकºयांना मिळू शकत नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी, सक्तीची वसुली बंद आदी अनेक सवलतींपासून वंचित रहावे लागेल. पैसेवारी ठरविण्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक पिकांसाठी सुमारे १२ भूखंड निवडल्या जातात. पिक पैसेवारीत बदल झाल्यास हंगामी (तात्पुरती) पैसेवारी जाहीर करण्यात येते. गावांच्या शिवारात, एकुण पेरलेल्या वा लागवडीखालील एकुण क्षेत्रफळाच्या ८० टक्क्यांपर्यंतची सर्व पिके ही पैसेवारी काढण्यास मान्य करण्यात येतात.
शेतकरी कृती समितीचे एस.बी. पाटील यांनी याबाबत सांगितले की, १० मीटर ७ .१० मीटर (१ आर) असा शेतीतील चौरस भाग घेउन त्यात निघणाºया धान्याचे उत्पादन, राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागाने पुरविलेल्या मागील १० वर्षाच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाशी ताडुन, निघणारा निष्कर्ष म्हणजे पैसेवारी. यात हलकी, मध्यम,चांगली अशा विविध प्रकारच्या प्रकारच्या जमिनी निवडल्या जातात. पैसेवारी कशी काढावी याचे सरकारी निकष, मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यानुसार पैसेवारीत आवश्यक ती नियमानुसार चढ/घट करण्यात येते. अशा प्रकारे काढलेली पैसेवारीची सरासरी ५० पेक्षा कमी असल्यास दुष्काळ व त्यापेक्षा जास्त असल्यास सुकाळ असे समजल्या जाते. जळगाव जिल्ह्यातील ऐन वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या उत्पादन क्षमतेवर विपरित परिणाम झाला आहे. पिके हिरवीगार असली तरीही त्यांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना नजर पैसेवारी मात्र ५० पैशांच्या वर कशी आली? असा सवाल शेतकरी नेते व शेतकºयांकडून केला जात आहे. आधीच कर्जमाफीच्या घोळामुळे त्रस्त व खरीप पीककर्जापासून वंचीत शेतकºयांच्या जखमेवर यामुळे मीठ चोळण्याचेच काम प्रशासनाने केले आहे.

Web Title: farmers disappointed with crop valuation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.