लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजनेला सुरुवात केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत थकबाकीदारांनी आतापर्यंत ५ कोटी ४२ लाख रुपये मालमत्ता कराचा भरणा केला आहे. हा प्रतिसाद पाहता या योजनेला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
यात आता १५ फेब्रुवारीपर्यंत ७५ टक्के शास्ती माफी देण्यात आली आहे, तर १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत ५० टक्के दंड माफ केला जाणार आहे. १ ते १० मार्चदरम्यान २५ टक्के शास्ती माफ केली जाणार आहे.
या अभय योजनेत प्रभाग समिती तीनमध्ये सर्वांत जास्त १ कोटी ७७ लाख ६२ हजार सात रुपयांची वसुली झाली आहे, तर एकूण चारही प्रभागांत मिळून ५ कोटी ४२ लाख ७६ हजार ५३४ रुपये वसूल झाले आहेत. संपूर्ण मिळकतधारकांना थकबाकीचा संपूर्ण भरणा करतील त्यांनाच या शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे.