जळगाव : दररोज ओली पार्टी अन् मौजमस्तीसह पैशांची उधळपट्टी या कारणामुळे घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचे बिंग फुटले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामेश्वर कॉलनी येथील तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून घरफोडीतील किरकोळ ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. विशाल मुरलीधर दाभाडे (१९), अभिषेक ऊर्फ बजरंग परशुराम जाधव (१९), विशाल किशोर मराठे (१९, सर्व रा. रामेश्वर कॉलनी) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. दरम्यान, शनिवारी तिघांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकनाथ नगरातील सीताराम राठोड यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी ६ मे रोजी डल्ला मारीत ६५ हजारांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर १ जुलै रोजी विश्वकर्मा नगरातील रामप्रसाद सैनी यांच्या घरात चोरी झाली होती. त्यांच्या घरातून रोकड व दागिने असा एकूण ७० हजारांचा ऐवज लंपास झाला होता. त्यातच १३ जुलैच्या मध्यरात्री अयोध्यानगरात डॉ. विजय तांदळे यांच्या बांधकाम साईटवर वॉचमन असलेले गेंदालाल झिण्या बारेला यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीतून चोरून नेला होता. या तिन्ही घटनांप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार तपासचक्र फिरविल्यानंतर रामेश्वर कॉलनीतील विशाल मुरलीधर दाभाडे हा तरुण काहीही कामधंदा न करता दररोज ओली पार्टी करून मौजमस्ती करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी लागलीच त्यास शुक्रवारी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने मित्रांच्या मदतीने तीन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.
दोघांनाही केली अटक
विशाल दाभाडे याने साथीदार मित्र विशाल मराठे व अभिषेक ऊर्फ बजरंग परशुराम जाधव यांची नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी लागलीच त्यांचा शोध सुरू केला. दोघांनाही शहरातून अटक केली. त्यानंतर तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी तिघांना न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता, तिघांना सुनावणीअंती दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, किरकोळ ऐवजही तिघांकडून हस्तगत करण्यात आला आहे. चौथा संशयित चोरटा आकाश नागपुरे याचा पोलीस शोध घेत आहेत.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार अशोक महाजन, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, सुनील दामोदरे, दादाभाऊ पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी आदींनी ही कारवाई केली आहे.