सुनील पाटील
जळगाव : गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवात देखील खासगी ट्रॅव्हल्सला घरघर कायम असून प्रवाशी मिळत नसल्याने ट्रॅव्हल्स मालकांनी भाडे कमी केले, तरी देखील त्यांना प्रवाशी मिळत नाही. राखी पौर्णिमेला देखील अशीच परिस्थिती होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी गणेशभक्तांनी कोरोनामुळे या उत्सवाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जळगावहून बाहेरगावी जाणाऱ्या असो की बाहेरगावावरुन जळगावला येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला प्रवाशीच मिळत नाहीत. त्यामुळे एकूण बसेसच्या संख्येत निम्मेच बस नियमित धावत असून त्यादेखील पूर्ण क्षमतेने धावत नाहीत, त्यामुळे काही वेळा डिझेलचा खर्च निघणेही अवघड झालेले आहे. प्रवाशी आकर्षित करण्यासाठी पूर्वी पेक्षा भाड्यात कपात करण्यात आली आहे. बस रस्त्यावर धावायला लागली म्हणजे टॅक्स भरावाच लागतो. मग प्रवाशी मिळो अथवा ना मिळो.
जळगावातून एकट्या पुण्यासाठी ५० ते ५५ बसेस पूर्वी रोज धावत होत्या, आता ही संख्या २२ ते २३ च्या घरात आहे. मुंबई, सुरत, अहमदाबाद, इंदूरला जाणाऱ्या बसेसची संख्या घटली आहे. इंदूर व नागपूरसाठी तर फक्त एकच बस धावत आहे, त्यात देखील प्रवाशी मोजकेच असतात. त्यामुळे भाड्यातही कपात करण्यात आली आहे. तरी देखील प्रवाशांचा प्रतिसाद नाही. प्रवाशांअभावी निम्मेपेक्षा जास्त ट्रॅव्हल्स बस घरीच उभ्या आहेत.
असे आहे ट्रॅव्हल्सचे भाडे
मार्ग पूर्वी आता
जळगाव-पुणे ६५० ५००
जळगाव-मुंबई ७०० ७००
जळगाव-सुरत ६०० ५००
जळगाव-नागपूर ९०० ९००
जळगाव-इंदूर ६०० ५००
या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स
जळगाव-पुणे
जळगाव-मुंबई
जळगाव-सुरत
कोट....
डिझेल दरवाढीमुळे व्यवसायात तोटा
कोरोनामुळे प्रवाशीच मिळत नाही. कधी कधी तर निम्मेही प्रवाशी नसतात तर एकीकडून बस रिकामीच धावते. एस.टी.पेक्षा जास्त कर शासनाला भरतो, तरी देखील पार्सल व इतर बाबींची परवानगी मिळत नाही. कोरोनामुळे या व्यवसायाचे कंबरडे मुडले आहे. व्यवसायला प्रतिसाद नसल्याने बसेस घरीच थांबविल्या आहेत.
-सुशील नेटके, ट्रॅव्हल्स बस मालक
कोट...
डिझेलच्या दरात दरवर्षी वाढ होते. करात देखील शासन वाढ करतच असते. चालक, क्लिनर व हेल्पर यांना पगार द्यावाच लागतो. त्या तुलनेत प्रवाशी मिळत नाहीत. बहुतांश मालकांच्या ट्रॅव्हल्स बस उभ्याच आहेत. ट्रॅव्हल्स मालक, चालक व त्यावर अवलंबून असलेला सर्वच वर्ग संकटात आलेला आहे.
-प्रमोद झांबरे, ट्रॅव्हल्स मालक
प्रवाशी काय म्हणतात.....
कोट...
जळगाव-मुंबईचे रेल्वेचे आरक्षण व ट्रॅव्हल्सचे भाडे जवळपास सारखेच आहे. कोरोनामुळे प्रवाशी संख्या कमी असल्याने ट्रॅव्हल्सची बुकिंग लगेच होते, त्यामुळे ट्रॅव्हल्सचा प्रवास आज तरी परवडत आहे.
- सुनील भागवत पाटील, प्रवासी
कोट...
सुरत मार्गावर रेल्वेगाड्या कमी आहेत. त्यात आरक्षण लगेच मिळत नाही. ट्रॅव्हल्सचे भाडे कमी असल्याने तो पर्याय निवडला. सध्या ट्रॅव्हल्समध्येही जास्त प्रवाशी नाहीत. दोन्ही बाजुंनी ट्रॅव्हल्सनेच प्रवास केला. आर्थिकदृष्ट्या तो परवडला देखील.
-पृथ्वीराज पाटील, प्रवाशी