मनपाकडून अभय देण्याचे काम सुरू : मनपाने केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्या : ॲड. पोकळेंची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील आव्हाणे शिवारात होणाऱ्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाच्या डीपीआरमधून चूक केल्यामुळे मनपाला बसलेल्या १८ कोटींच्या भुर्दंडाबाबत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत दिले होते. मात्र, महिनाभरानंतरही मनपा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे डीपीआरच्या कामात चूक करूनही त्या अधिकाऱ्याला मनपा प्रशासनाकडून अभय देण्याचे काम का सुरू आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे डीपीआरमध्ये वाढ केलेल्या १८ कोटी रुपयांचा निधी मनपाच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्याचा प्रस्ताव महासभेत सर्वच सदस्यांनी विरोध करून, तहकूब ठेवला होता. तसेच ज्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे मनपाला १८ कोटी रुपयांचा भुर्दंड बसला अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. मात्र, तरीही मनपाकडून कारवाई करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी चौकशीला सुरुवातच नाही
या प्रकरणी ज्या अधिकाऱ्याने पहिला डीपीआर न पाहताच मंजूर करून, राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता त्या अधिकाऱ्याचे नावच अद्याप मनपा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. या प्रकरणी साधी चौकशीदेखील मनपाकडून करण्यात आलेली नसून, त्यामुळे त्या अधिकाऱ्याला अभय देण्याचे काम मनपाकडून सुरू असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. याबाबत बुधवारी ॲड. दिलीप पोकळे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या प्रकरणी मनपाकडून काय चौकशी झाली? याबाबतची लेखी माहिती देण्याची मागणी केली आहे.