जिल्हा परिषदसमोरील रस्त्याची दुरुस्ती
जळगाव : पावसामुळे जिल्हा परिषदसमोरील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी झालेल्या चिखलामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर मनपा प्रशासनातर्फे बुधवारी या रस्त्यावर मुरुम टाकून, खड्डे बुजविण्यात आले. यामुळे रस्त्यावरील चिखल काहीसा कमी झाला असून, नागरिकांना पायी चालणे सोयीचे झाले आहे.
रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानिमित्त स्टेशन चकाचक
जळगाव : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी हे बुधवारी भुसावळ दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे स्टेशनच्या सर्व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून, सर्व परिसर चकाचक करण्यात आला होता. स्टेशनवर दिवसभर रेल्वेचे कर्मचारी आपल्या गणवेशात काम करताना दिसून आले. स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तिकीट तपासणी करण्यात येत होती. रेल्वे पोलिसांचाही बंदोबस्त तैनात दिसून आला.
भावेश ढाके यांची निवड
जळगाव : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव शहर समन्वयकपदी भावेश ढाके यांची निवड करण्यात आली आहे. तर विभाग समन्वयकपदी विशाल निकम यांची निवड करण्यात आली आहे. राज्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही निवड केली आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : जळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे, स्थानिक प्रवाशांना जागा मिळणे अवघड होत आहे. यामुळे विशेषत: महिला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तरी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, या गाडीला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.