‘अमृत’च्या कामांमुळे जळगावकरांच्या जीवाला ताण; पाणी साचले, टागोर नगरात भिंत पडली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अनेक दिवसांपासून शहर व तालुक्यातून दडी मारलेल्या पावसाने तब्बल अकरा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात जोरदार ‘कमबॅक’ केले आहे. दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेली पावसाची ‘जोर’धार सुमारे अर्धा तास बरसली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, या पावसामुळे शहरात अमृतमुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने व काही ठिकाणी चिखल झाल्यामुळे जळगावकरांच्या जीवाला ताण वाढला आहे. अर्धा तास चाललेल्या जोरदार पावसामुळे शहरात नेहमीप्रमाणे नेहमीच्याच ठिकाणावर पाणी साचले होते. यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली.
जून महिन्यात मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्यानंतर काही दिवसात पावसाने सम-विषम प्रमाणात जिल्ह्यात हजेरी लावली होती. मात्र, २८ जूननंतर जिल्ह्यात अचानक पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तसेच शहराचा पारादेखील जुलै महिन्यात ४० अंशांवर पोहोचल्याने जळगावकरांना ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचीच जाणीव झाली. त्यात पावसाअभावी पेरणीदेखील पूर्ण झाली नव्हती. काही ठिकाणी पेरणीनंतर उगवलेली पिके पाऊस नसल्याने कोमेजून गेली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
रस्त्यावरील चिखलाने नागरिक त्रस्त
अमृतअंतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती अनेक ठिकाणी पूर्ण झालेली नाही. त्यातच अनेक भागात झालेली दुरुस्तीदेखील गुणवत्तापूर्वक नसल्याने त्याचा फटका जळगावकरांना बसणार हे निश्चित झाले असून, शुक्रवारी झालेल्या पावसानंतर हे सिध्द झाले. अनेक भागातील ऱस्त्यांवर खोदलेल्या रस्त्यांमुळे चिखल झाला होता. यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागली. आर. आर. विद्यालय परिसर, नेहरू चौक, रिंगरोडकडून कोर्टाकडे येणाऱ्या रस्त्यालगतदेखील वाहनधारकांचे हाल झाले. विशेष म्हणजे पावसाने दडी मारल्याने ही दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र, दुरुस्ती न झाल्याने आता संपूर्ण पावसाळ्यात जळगावकरांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.
गटार ब्लॉक झाल्याने रस्त्यावर साचले पाणी
शहरातील गटारींची साफसफाई नियमितपणे होत नसल्याने त्याचा फटका शुक्रवारी झालेल्या पावसामुळे जळगावकरांना पुन्हा बसला. शहरातील प्रभात चौक, भोईटे शाळेजवळील गटारी पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागात वारंवार ही समस्या निर्माण होत असताना मनपा प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना याठिकाणी करण्यात आलेली नाही. यासह नेहमीप्रमाणे नवीपेठ, स्टेडियम कॉम्प्लेक्स, कोर्ट चौक, बजरंग बोगदा, आकाशवाणी चौक परिसरात पाणी साचले होते.
उकाड्यातून सुटका
जिल्ह्यात तब्बल अठरा वर्षांनंतर जुलै महिन्यात जळगावकरांना ‘मे’ हिटचा अनुभव आला होता. पावसाने दडी मारल्याने पारा ४० अंशांपर्यंत गेल्याने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, गुरुवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजल्यानंतर काळे ढग जमा होऊन जळगावात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना काहिसा दिलासा मिळाला.
बळीराजा सुखावला
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कडक उन्हाचे चटके बसत होते. यामुळे पिके करपू लागली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, पिकेदेखील पावसानंतर डोलू लागली होती. तरीही पुरेशा जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, आगामी काही दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.