भाजपचा अधिकृत ‘गटनेता’ कोण ? : विभागीय आयुक्तच घेणार निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येणार असून, स्थायीचे ८ सदस्यदेखील पुढील महिन्यातच निवृत्त होणार आहेत. मात्र, भाजपच्या अधिकृत गटनेतेपदावरून भाजप बंडखोर व भाजपमध्ये वाद सुरु असल्याने जोपर्यंत गटनेतेपदाचा निर्णय होणार नाही. तोपर्यंत मनपा स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणे कठीण असल्याची माहिती मनपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
भाजपचा अधिकृत गटनेतेपदावर बंडखोर नगरसेवकांच्या गटाने दावा ठोकला असून, ॲड. दिलीप पोकळे यांची गटनेतेपदावर निवड केली आहे. तर भाजपने भगत बालाणी हेच गटनेते कायम असल्याचे सांगितले आहे. ३० नगरसेवकांनी भाजपविरोधात मतदान करून, बंडखोरी केली असली तरी हे नगरसेवक भाजपचेच सदस्य आहेत. त्यात विभागीय आयुक्तांकडे या नगरसेवकांविरोधात अपात्रतेची तक्रार दाखल असली तरी याबाबत अद्याप विभागीय आयुक्तांकडे कामकाज सुरुच आहे. त्यामुळे याबाबत निर्णय होत नाही तोवर बंडखोर नगरसेवक भाजपचेच नगरसेवक म्हणून कायम राहणार आहेत. तसेच गटनेतेपदावरदेखील बंडखोरांनी दावा केल्यामुळे हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.
अधिकृत गटनेता कोण? याचा निर्णय होईना
१.भाजपचा अधिकृत गटनेता कोण? याबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही. बंडखोर नगरसेवकांनी याबाबत ॲड. दिलीप पोकळे यांची निवड करून, विभागीय आयुक्तांकडे तसा प्रस्तावदेखील दाखल केला आहे.
२. तर भाजपदेखील भगत बालाणी हेच गटनेते असल्याने, भाजपकडून स्थायी समितीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा नावासह सभापतीपदासाठी ही प्रस्ताव भाजपकडून दाखल केला जाणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
इच्छुकांचा मात्र हिरमोड
एकीकडे गटनेतेपदावरून वाद सुरु असताना, दुसरीकडे महापालिकेच्या स्थायी समितीपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा निवडणूक लांबण्याची शक्यता असल्याने हिरमोड झाला आहे. अनेकांनी स्थायी समितीत जाण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फेऱ्या मारायला सुरुवात केली आहे. तर, अनेकांनी सभापतीपदासाठीही तयारी सुरु केली आहे. मात्र, गटनेतेपदाचा वाद केव्हा संपणार? याकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे.