जळगाव : मोहाडी, नागझिरी व धानोरा परिसरातून अवैधरित्या वाळूची तस्करी करणारे आठ ट्रॅक्टर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी मोहाडी रस्त्यावर पकडले. सर्व ट्रॅक्टर रामानंद नगर पोलीस ठाण्यात लावण्यात आलेले आहेत. या भागातून होणाऱ्या अवैध वाळूच्या वाहनावर कधीच कारवाई झालेली नव्हती. या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.तालुक्यातील मोहाडी, नागझिरी व धानोरा येथून पहाटेच्या सुमारास अवैध वाळूची ट्रॅक्टरद्वारे तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या आदेशाने परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, कर्मचारी संदीप बिऱ्हाडे, प्रकाश कोकाटे, फारुख शेख, अमोल कर्डेकर, रवींद्र मोतीराया, प्रकाश मुंडे व प्रशांत साखरे यांच्या पथकाने आरसीपीच्या मदतीने गुरुवारी पहाटे सहा वाजता मोहाडी रस्त्यावर कारवाईचा सपाटा लावला. एकामागून एक आलेले तब्बल आठ ट्रॅक्टर पकडून ते रामानंद नगर व तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत ही कारवाई चालली. तहसीलदारांनाही कारवाईचा अहवाल पाठविण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक नदी पात्रात उतरल्यानंतर सर्वत्र अवैध वाळू बंद झालेली असताना या भागातील वाळू कधी बंद झाली नव्हती. काही महिन्यापूर्वी तर कारवाई करणाऱ्या पोलिसांचीच एका लोकप्रतिनिधीने खरडपट्टी काढली होती. त्यामुळे या भागात शक्यतो कारवाई करण्यासाठी कोणी धजावत नव्हते.
अवैध वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 19:13 IST