जळगाव : जिल्ह्याला लाभलेल्या वनसंपदेमुळे जगात दुर्मीळ होत जाणाऱ्या पक्षी, प्राणी व वनस्पतींची नोंद जिल्ह्यात काही वर्षांपासून होऊ लागली आहे. आता नव्यानेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे व अमन गुर्जर यांना जळगाव शहराला लागून असलेल्या मण्यारखेडा तलाव परिसरात जागतिक पातळीवर संकटग्रस्त पक्षी म्हणून नोंदल्या जाणाऱ्या इजिप्शियन गिधाड या पक्ष्यासोबतच भारतीय ठिपकेवाला गरुड, माळरान गरूड , मोठा ठिपकेवाला गरुड, तुरूमती ससाणा व पांढुरका हरीण या पक्ष्यांची नोंद घेण्यास यश मिळाले आहे.
या तिघांनी केलेले हे संशोधन नुकतेच ‘ईला’ या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाले. या संशोधनासाठी डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन व बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, रवींद्र फालक, मयुरेश कुलकर्णी, चेतन भावसार, स्कायलॅब डिसुजा, भूषण चौधरी, सतीश कांबळे, गौरव शिंदे, योगेश गालफाडे, अजिम काझी, सुरेंद्र नारखेडे, ऋषी राजपूत यांचे सहकार्य लाभले. शहरापासून अवघ्या ५ किमी पूर्वेला असलेल्या मण्यारखेडा तलाव परिसरात या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. या पक्षी अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासात तब्बल २९ शिकारी पक्ष्यांच्या सचित्र नोंदी घेण्यात यश मिळाले आहे. यापैकी इजिप्शियन गिधाड, भारतीय ठिपकेवाला गरुड, माळरान गरूड , मोठा ठिपकेवाला गरुड, तुरूमती ससाणा व पांढुरका हरीण या पक्षी प्रजाती जागतिक पातळीवर संकटग्रस्त आहेत. शिकारी पक्षी हे अन्न साखळीतील सर्वोच्च भक्षक असल्यामुळे त्यांची या परिसरातील मोठी संख्या ही येथील तलाव परिसंस्था व माळरान परिसंस्था सुदृढ असल्याचे निदर्शक आहे.
७ वर्षांत ९ गिधाडांची झाली नोंद
मृतोपजीवी असल्याने निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळख असलेल्या गिधाडांचे १९९५ नंतर अस्तित्वच संपतेय की काय? अशी भीती होती. परंतु दोन वर्षात संस्थेच्या या पक्षीमित्रांनी गेल्या ७ वर्षात ९ गिधाडांची नोंद केली आहे. यात लाँग बील्ट व्हल्चर २ आणि आता इजिप्शियन व्हल्चर ३ यांचा समावेश आहे.
गिधाडांचे महत्व पटवून देण्यावर भर
गिधाडांच्या या प्रजातीची आययूसीएन रेड डाटा लिस्ट मध्ये संकटग्रस्त प्रजाती म्हणून नोंद आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात या पक्ष्यांच्या अस्तित्वाची नोंद होणे ही जळगावच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. ज्या भागात ही गिधाडे नोंदविली. तेथे यांच्या अधिवासाचा शोध घेऊन तेथील नागरिकांना गिधाडांचे महत्त्व पटवून त्यांच्या सुरक्षिततेबद्दल जागृत करू असे संस्थेचे पक्षीमित्र राहुल सोनवणे यांनी सांगितले. तसेच मण्यारखेडा हा परिसर पक्ष्यांसाठी नंदनवन असून, गणपती विसर्जन, दुर्गा विसर्जन काळात स्वच्छतेसाठी मेहरुण तलावावरच भर दिला जातो. मण्यारखेडा तलावावर तशा यंत्रणा अभावानेच दिसून येतात. यावर भर देण्याची गरज असल्याचे राहुल सोनवणे यांनी सांगितले.
कोट..
भक्ष्यच उपलब्ध नसल्याने गिधाडांची उपासमार होऊन त्यांची संख्या कमी होऊन आता तर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशात जळगावच्या आकाशात गिधाडांची भिरभिर चांगली बाब आहे. शिकारी पक्ष्यांसोबतच आम्ही केलेल्या अभ्यासादरम्यान एकूण २२३ पक्षी प्रजाती नोंदवल्या आहेत.
- प्रसाद सोनवणे, वनस्पती व पक्षी अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था,
तलाव परिसरात आययुसीएन रेड डाटा लिस्टमध्ये संकटग्रस्त पक्षी प्रजातीत समाविष्ट इजिप्शियन गिधाड, लहान व मोठा ठिपकेवाला गरुड, माळरान गरूड, रेड-हेडेड फाल्कन, पांढुरका हरीण यासोबतच, लाँग लेग्ड बझर्ड, सर्प गरूड, ससाणे, चिमणबाज तसेच घुबडे ही चांगल्या संख्येत आहेत. मात्र, वाढत्या औद्योगिक प्रदूषण, मानवी हस्तक्षेपापासून हे पक्षी नंदनवन वाचवण्याची आवश्यकता आहे.
-अमन गुजर, पक्षी अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था,