जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यांची समस्या गंभीर झाली असून, खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे नागरिकांचे पाठीचे आजार एकीकडे वाढत असताना दुसरीकडे खराब रस्त्यांच्या समस्येमुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. खराब रस्ते व वाढते बांधकाम यामुळे शहरात धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत शहरातील वातावरणात धूलिकणांचे प्रमाण दुपटीने वाढले असून, कोरोनाच्या काळात हेच सूक्ष्म धूलिकण विषाणूवाहक असल्याने शहरवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
वायुप्रदूषण आणि कोरोनाचा प्रसार याचा थेट संबंध येत असल्याची बाब एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. अतिप्रदूषित शहरांमध्येदेखील कोरोनाचे प्रमाण वाढून मृत्यूची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट झाले होते. या निष्कर्षामुळे जळगावकरांच्या चिंतादेखील वाढल्या आहेत. कारण जळगाव शहरातील वातावरणात गेल्या दोन वर्षांत धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण तिपटीने कमी झाले होते. मात्र, नोव्हेंबर २०२० नंतर पुन्हा वातावरणात धूलिकणांचे प्रमाण वाढू लागले आहे.
धूलिकणांचे वातावरणात वाढत जाणारे प्रमाण
मार्च २०१९ - ६७ टक्के
जुलै २०१९ - ७५ टक्के
डिसेंबर २०१९ - ७० टक्के
मार्च २०२० - ५५ टक्के
एप्रिल २०२० - ३५ टक्के
ऑगस्ट २०२० - ७० टक्के
डिसेंबर २०२० - ७९ टक्के
मार्च २०२१ - ८५ टक्के
जून २०२१ - ९० टक्के
शरीरात जाणाऱ्या धूलिकणांच्याही प्रमाणात वाढ
१. प्रदूषण नियंत्रण विभागाकडून धूलिकणांचे दोन प्रकार करण्यात आले आहेत. यामध्ये श्वसनाद्वारे शरीरात जाणारे धूलिकण (रिस्पेरेबल सस्पेडंट पर्टिक्युलर मॅटर) व श्वसनाद्वारे शरीरात न जाणारे धूलिकण (सस्पेडंट पर्टिक्युलर मॅटर).
२ . दोन्ही धूलिकणांच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी सर्वाधिक वाढ श्वसनाद्वारे शरीरात न जाणाऱ्या धूलिकणांमध्ये झाली आहे. यामुळे नागरिकांच्या डोळ्यांवर व त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
३. या धूलिकणांचे प्रमाण वातावरणात ६० ते १०० टक्के इतके राहिले तर यामुळे मानवी आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. मात्र जळगावात याचे प्रमाण हे १५० टक्क्यांपेक्षा अधिक आढळून आले आहे. तर श्वसनावर परिणाम करणाऱ्या धूलिकणांच्या प्रमाणातदेखील वाढ झाली असून, हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
५० टक्क्यांपेक्षा प्रमाण वाढल्यास श्वसनाला होतो त्रास
वातावरणातील प्रमाण - होणारा त्रास
५० टक्क्यांपेक्षा कमी - मानवी आरोग्यावर फार काही परिणाम नाही
५१ ते १०० - श्वसनाचे विकार असलेल्यांना होतो त्रास
१०१ ते २०० - लहान मुले व ज्येष्ठांना श्वास घेण्यास होतो त्रास
२०१ ते ३०० - कायमस्वरूपी श्वसनाचे आजार होण्याची भीती
धूलिकण हे विषाणूवाहक
कोरोना किंवा इतर विषाणू हे पीएम २.५ सारख्या कणांना चिकटतो, असे पुरावे देशातील विविध विद्यापीठांतील तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात देण्यात आले आहेत. याच धूलिकणांमुळे विषाणू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचे माध्यम बनत असतो. वायुप्रदूषणामध्ये सूक्ष्म धूलिकण व धूर यांचे मिश्रण हेच विषाणूसाठी पोषक ठरते.
कोट...
धूलिकणांमुळे फप्फुसाच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. कोरोना होऊन गेलेल्या किंवा झालेल्या रुग्णाच्या फप्फुसातील ऑक्सिजनवरदेखील यामुळे परिणाम होत असतो. धूलिकणांमुळे कोरोना वाढतो, असा निष्कर्ष काढणे कठीण असले तरी धूलिकण श्वसनाच्या माध्यमातून फप्फुसांपर्यंत पोहोचल्याने अनेकदा यामुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात.
- डॉ. राधेश्याम चौधरी, सचिव, आयएमए