लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते भादली दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गावरील नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी १६ व १७ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल १५ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ विभागात पहिल्यांदा हा ३४ तासांचा मेगाब्लॉक होत असून, हा ब्लॉक यशस्वी होण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.
जळगाव ते भादली दरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या मार्गामुळे भुसावळ ते जळगाव दरम्यान गाड्या विलंबाने धावण्याचे प्रमाण कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे. दरम्यान, मार्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव रेल्वे स्टेशनच्या हद्दीत १६ व १७ जुलै रोजी सिग्नल यंत्रणेत बदल करण्यासाठी व इतर तांत्रिक कामासाठी ३४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी नुकतीच मुंबईतील मुख्य अभियंता सुधीर पटेल व दूरसंचार विभागाचे मुख्य अभियंता अखिलेश मिश्रा यांनी पाहणीदेखील केली. १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता ब्लॉकला सुरूवात होऊन, दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता हा ब्लॉक संपणार आहे.
इन्फो :
या गाड्या सुरू राहणार
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या ब्लॉकमधून काही गाड्या मात्र वगळल्या आहेत. यामध्ये काशी एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, कामायानी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे; मात्र मेगाब्लॉकमुळे या गाड्या एक ते दोन तासांपर्यंत विलंबाने धावणार आहेत.
इन्फो :
मेगाब्लॉकमुळे या गाड्या आहेत रद्द
१) राजधानी एक्स्प्रेस
२) सेवाग्राम एक्स्प्रेस
३) अजनी एक्स्प्रेस
४) पुणे- अमरावती एक्स्प्रेस
५) प्रयागराज एक्स्प्रेस
६) आग्रा कॉन्ट एक्स्प्रेस
७) दुरंतो एक्स्प्रेस
८) अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
९) अमृतसर एक्स्प्रेस
१०) महाराष्ट्र एक्स्प्रेस
११) नागपूर-पुणे एक्स्प्रेस
१२) पंजाब मेल
१३) हरिद्वार एक्स्प्रेस
१४) केवडिया एक्स्प्रेस
१५) पुणे-नागपूर विशेष एक्स्प्रेस
१६) सुरत-अमरावती एक्स्प्रेस
१७) नंदुरबार-भुसावळ एक्स्प्रेस
१८) भुसावळ-सुरत एक्स्प्रेस
इन्फो :
दहा पार्सल गाड्याही रद्द
रेल्वे प्रशासनातर्फे या दीड दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक प्रवासी एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्यानंतर, पार्सल गाड्याही दोन दिवस रद्द ठेवल्या आहेत. यामध्ये किसान एक्स्प्रेससह इतर माल वाहतूक गाड्यांचा समावेश आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूकही खोळंबणार आहे.