लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनात गंभीर झालेल्या आईची प्रकृती सुधारल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाचे आभार मानत मुलाने या आनंदात रुग्णालयाला कामी येणारी एखादी वस्तू भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत या मुलाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेटही घेतली. प्रशासन लवकरच आवश्यकता असलेल्या बाबी पडताळून या मुलाला सांगणार आहे.
योगेश्वर नगरातील रहिवासी शोभा जगन्नाथ वाणी ५८ यांना केारेानाची लागण झाली होती. प्रकृती गंभीर होती. त्यांना ऑक्सिजनची गरज भासत होती. अशा स्थितीत त्यांना १३ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. मधूमेह असल्याने चिंता होतीच. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने त्या या कोरोनातून बाहेर निघाल्या. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आईने या गंभीर आजारावर मात केल्याने शोभा वाणी यांचे चिरंजीव ललित वाणी यांनी गुरूवारी सायंकाळी अधिष्ठाता यांची भेट घेतली आणि आभार मानले.