काही दिवसांपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवून पाणी प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. यावर आक्रमक झालेल्या भाजपने पाणी मागणे गुन्हा आहे का..?, असा सवाल उपस्थित केला तर त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेने भाजपवर विकास कामांना विरोध करत असल्याचा आरोप केलाय. परंतु या आरोप-प्रत्यारोपात पाणी प्रश्न सोडवायला कुणालाही वेळ नाही, अशी परिस्थिती आहे.
या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असून या विषयावर राजकीय पक्ष आक्रमक होत असल्याचे लक्षात येते. मात्र या विषयात स्थानिक नागरिकांची पाण्यावाचून कोंडी होत आहे.
धरणगाव शहरात विकास कामे जोरात सुरू आहेत हे मात्र तेवढेच खरे. मात्र पाणी प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे.
दुसरीकडे अनलॉक झाल्यानंतर धरणगाव शहरात प्रचंड प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. नागरिक गावात विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. तर सततच्या कारवाईमुळे नागरिकांसह पोलीस अधिकारी यांना पोलीस खात्यातील कर्मचारी देखील कंटाळले आहेत. दुसरीकडे मात्र, गावातील चोऱ्यांचे सत्र मात्र सुरूच आहे. मागील काही दिवसात घरफोडी झालेल्या आहेत. चोरांचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन मात्र अपयशी ठरलेले दिसून येत आहे. शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन महिने उलटल्यानंतर भरड धान्य खरेदी केंद्र सुरू होणार आहे. यात शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले धान्य मोजक्या किमतीत देण्यात येणार असून शेतकरी वर्ग देखील चिंतेत दिसून येत आहे.