लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: राज्यातील जिल्हा बँकेतील नोकर भरतीतील संचालकांच्या मर्जीला शासनाने आवर घातला आहे. यापुढे नोकर भरतीची प्रक्रिया शासनाने शिफारस केलेल्या तीनपैकी एका संस्थेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, असा आदेश सहकार विभागाने दिला आहे. ७० टक्के स्थानिकांना संधी बँकांचे हित जोपासण्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील ७० टक्के उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. ३० टक्के उमेदवार अन्य जिल्ह्यातील असतील.
जळगाव जिल्हा बँकेने काही दिवसांपूर्वी काढलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या जाहिरातीत कला शाखेच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने नाराजीची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा बँकेतील नोकर भरतीवरून गेल्या काळात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले आहे. बँकेचे संचालक व आमदार एकनाथ खडसे यांनी नोकर भरती पारदर्शकपणे व्हावी यासाठी शासनाकडून नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत नोकर भरती करण्याची मागणी केली होती.
३१ जिल्हा बँकेत भरती सुरू
बँकांमध्ये रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळ जिल्हा बँकेत १३३ रिक्त पदे आहेत. त्याचबरोबर जळगाव २२०, ठाणे १२३ आणि राज्य सहकारी बँकेत १६७ रिक्त पदे आहेत.
या संस्थांची शिफारस
भरती प्रक्रियेसाठी सहकार विभागाने तीन संस्थांची शिफारस केली आहे. या प्राधिकृत केलेल्या तीनपैकी एका संस्थेमार्फतच ही नोकर भरतीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.