जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त पाच गावांमधील शालेय विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेतीसोबतच अनेक विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यदेखील वाहून गेले. अशा स्थितीत विद्यापीठाच्या वतीने पूरग्रस्त भागातील २१ गावांमधील ३०५ घरांचा सर्व्हे करण्यात आला. रोकडेगाव, रोकडेतांडा, हातले, मजरे, वाकडू व पिंपरखेड आदी गावांतील २५६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वतीने पाच वह्या, पेन्सिल, पेन, खोडरबर, उजळणी पुस्तक व फोल्डर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, अधिसभा सदस्य अमोल पाटील, रासेयोचे संचालक प्रा. पंकजकुमार नन्नवरे, परीक्षा व मूल्य मापन मंडळाचे संचालक प्रा. किशोर पवार, प्रा. डॉ. राहुल कुळकर्णी, प्रा. प्रशांत कसबे, मनोज कापडणे, सारंग पाटील, दीपक पाटील, रितेश महाजन, आकाश धनगर, ज्ञानेश्वर उद्येवाल तसेच ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी आभार मानले.